मुंबई - META कंपनीने सुपर इंटेलिजेंस लॅबमध्ये मोठे बदल केले आहेत. त्या लॅबमध्ये Open AI, गुगल आणि Apple सारख्या कंपन्यामधील बड्या इंजिनिअर्सला नोकरीवर ठेवले आहे. त्यातीलच एक आयआयटी बॉम्बेमधून इंजिनिअर केलेल्या ऋषभ अग्रवाल याला मेटाने ८ कोटींचं पॅकेज देत नोकरीवर ठेवले. परंतु अवघ्या ५ महिन्यात ऋषभने नोकरी सोडली. ऋषभच्या या निर्णयामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
काहीतरी वेगळं करायचंय...
ऋषभ अग्रवालने सोशल मीडियावर सांगितले की, मला आता आयुष्यात वेगळे रिस्क घ्यायचे आहे. काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे. सुपरइंटेलिजेंस TBD लॅबची नोकरी सोडण्याचा निर्णय घेणे कठीण होते. इथं टॅलेंट आणि कॉम्प्यूटिंग पॉवर पाहता ते आणखी आव्हानात्मक होते. परंतु गुगल ब्रेन, डिपमाइंड आणि मेटा येथे साडे सात वर्ष नोकरी केल्यानंतरही मी समाधानी नाही. काही तरी वेगळे करायचंय हा विचार डोक्यात असल्याने मी राजीनामा दिला आहे असं त्याने म्हटलं.
तर ऋषभ अग्रवाल एकटाच नाही ज्याने मार्क झुकेरबर्गच्या मेटा कंपनीतून राजीनामा दिला. त्याच्यासोबत कमीत कमी ३ रिसर्चर्स यांनीही राजीनामा दिला आहे. त्यातील दोन पुन्हा Open AI मध्ये निघून गेले, त्यात एक भारतीय अवी वर्मा नावाचा युवक होता. ऋषभ अग्रवाल हादेखील भारतीय असून त्याने मुंबईत आयआयटी बॉम्बे संस्थेतून इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले. त्याने क्यूबेक आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन्स्टिट्यूटमधून संगणक विज्ञानात डॉक्टरेट देखील घेतली आहे. सोबतच सावन, टॉवर रिसर्च कॅपिटल आणि वेमो येथे इंटर्नशिप करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. २०१८ मध्ये ऋषभ गुगल ब्रेनमध्ये सीनिअर रिसर्च साइंटिस्ट म्हणून ज्वाईन झाला होता.
दरम्यान, मेटाने गुगल माइंड, ओपनएआय आणि एक्सएआय सारख्या स्पर्धक एआय कंपन्यांमधील कौशल्यवान एक्सपर्ट यांना सुपरइंटेलिजेंस लॅबमध्ये आणण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस देऊ केले आहेत. ऋषभ अग्रवाल याने रिसर्चमध्ये रिइनफोर्समेंट लर्निंग आणि एप्लिकेशनवर काम केले होते. एप्रिल २०२५ मध्ये मेटाच्या सुपरइंटेलिजेंस लॅबमध्ये त्याने नोकरीला सुरूवात केली आणि अवघ्या ५ महिन्यात नोकरी सोडली.