माहोली (उ.प्र) : उत्तर प्रदेशाच्या सीतापूर जिल्ह्यातील माहोली शहरात मात्र धार्मिक सलोख्याचे एक अनोखे उदाहरण पाहायला मिळत आहे. तेथील कथिना नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मंदिर, मशीद व गुरुद्वारा अशी प्रार्थनास्थळे एकदिलाने पुढे आली असून, त्यांनी आपापल्या धर्मबांधवांना साद घातली आहे.माहोलीमध्ये कथिना नदीच्या तीरावर प्रज्ञा सत्संग आश्रम व त्याच्याच प्रांगणात शंकर व राधाकृष्णाचेपुरातन मंदिर आहे. त्याला लागूनच मशीद आहे. कथिना ही गोमतीची उपनदी आहे. दोन्ही तीरांवरील अनेक गावांतून कचरा व सांडपाणी सोडले जात असल्याने ही नदी प्रदूषित झाली आहे.प्रज्ञा सत्संग आश्रमाचे प्रमुख स्वामी विज्ञानानंद सरस्वती यांनी सांगितले की, कथिना नदी सर्वांचीच आहे आणि पाण्याला धर्म नसतो. हिंदू तिच्या पाण्याने आचमन करतात तर नमाजाआधी वजू करण्यासाठी मुस्लीमही तेच पाणी वापरतात.ही नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेणे आवश्यक होते. त्यामुळे स्वामी विज्ञानानंद यांनी नदीतीरावरील मशिदीच्या व्यवस्थापकीय समितीचे प्रमुख मुहम्मद हनीफ यांच्यासह नदीच्या पात्राची नुकतीच पाहणी केली. कथिना पदूषणमुक्त करण्यासाठी प्रज्ञा सत्संग आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती यात्रा काढायला सुरुवात केली. हे पाहून आश्रमाच्या शेजारील मशिदीतीले लोक व शीख गुरुद्वारा कमिटीचे कार्यकर्तेही त्यात सामील झाले. अशा रितीने तीनही धर्मांतील लोकांनी एकजुटीने या कार्याला आता वाहून घेतले आहे. (वृत्तसंस्था)>मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसादकथिना नदीमध्ये असलेला कचरा साफ करण्याची मोहीम १७ मार्च रोजी सुरू झाली. तब्बल ४०० कार्यकर्ते नदीतील कचरा बाहेर काढत होते, तर ७०० कार्यकर्ते किनाऱ्यावरील सफाईच्या कामात गुंतले होते. नदीच्या तीरावरील गावांत शौचालये, डंपिंग ग्राउंड नाहीत. त्यामुळे सगळी घाण नदीत जाते. त्यामुळे मशिदीतील कार्यकर्त्यांनी मुस्लीमबहुल, मंदिर कार्यकर्त्यांनी हिंदुबहुल भागांत तर गुरुद्वारातून शीखांचे प्रबोधन होणार आहे.
हिंदू, मुस्लीम व शिखांची एकदिलाने नदीसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 04:07 IST