मौनी अमावास्येच्या काळात संगमावर डुबकी लगावणे पवित्र मानले जात असल्याने देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक महाकुंभामध्ये सहभागी झाले आहेत. एवढी गर्दी झालीय की ती नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला काही ट्रेन रद्द कराव्या लागल्या आहेत. यामुळे तुमची रेल्वे रद्द झाली का याचे आवाहन केले जात असताना महाकुंभहून परतणाऱ्या भाविकांनी अयोध्या गाठल्याने तिथेही मोठी गर्दी लोटली आहे.
राम मंदिर सुरु झाल्यानंतर जी गर्दी दिसत होती ती आता पुन्हा दिसू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत २५ लाखांहून अधिक भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. एवढी गर्दी पाहून नियंत्रित करण्यासाठी अयोध्येचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने व्यवस्थाही कोलमडली आहे.
या गर्दीमुळे दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी १५ लाख आणि सोमवारी १० लाख भाविक आल्याचा अंदाज सरकारी यंत्रणांनी लावला आहे. रामपथवर भाविकांचा जनसागर लोटल्याचे दिसत आहे. याच ठेवायला जागा नसलेल्या अयोध्येत एक महिला आणि एका पुरुषाला चक्कर आली होती. त्यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. गर्दीच्या दबावामुळे हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
५०० मीटरवर असलेल्या हॉस्पिटलमध्ये या दोघांना नेण्यासाठी ४५ मिनिटे लागल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांवरही प्रचंड ताण आला आहे. वैद्यकीय कर्मचारी देखील त्यांच्या नियोजित स्थळी जाऊ शकत नाहीत एवढी गर्दी झाली आहे. महामार्ग आणि रामपथच्या बाहेरील भागात राहणारे लोक महत्त्वाच्या कामासाठीही शहरात येऊ शकत नाहीत. मोठ्या संख्येने वाहनांच्या आगमनामुळे पोलिस आणि प्रशासनाची पार्किंग व्यवस्थाही कोलमडली आहे. ओव्हरब्रिजपासून चुडामणी चौक आणि महोबारा महामार्गापर्यंत दोन्ही ट्रॅकवर वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत.