नवी दिल्ली : ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठाच्या संशोधकांनी अणुऊर्जेवर चालणारी जगातील पहिली डायमंड बॅटरी विकसित केली असून, ही बॅटरी हजारो वर्षे चालण्यास सक्षम आहे. तिला चार्ज करण्याची गरजच नाही. ब्रिस्टल विद्यापीठाचे प्राध्यापक नील फॉक्स यांनी सांगितले की, डायमंड हा पृथ्वीवरील सर्वाधिक कठीण पदार्थ आहे. त्याच्यापेक्षा जास्त सुरक्षा देणारा पदार्थ अस्तित्वातच नाही. त्यामुळे ही बॅटरी सुरक्षित आहे.
किरणोत्सर्गाचा धोका नाही
सूत्रांनी सांगितले की, किरणोत्सर्गी कार्बन-१४ चा वापर डायमंड बॅटरीत केला जात असला तरी ती वापरासाठी पूर्णत: सुरक्षित आहे. उत्सर्जनास सिंथेटिक डायमंड आवरणाच्या आतच नियंत्रित केले जाते. त्यामुळे ते बाह्य वातावरणात पसरत नाही. अशा बॅटरींचा भविष्यात वापर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यांची निर्मिती करताना पुरेशी काळजी घ्यावी लागणार आहे.
बॅटरी कसे काम करते?
या बॅटरीत कार्बन-१४ नामक आयसोटोपचा वापर करण्यात आला आहे. या आयसोटोपचे आयुष्य तब्बल ५,७३० वर्षे आहे.
बॅटरी डायमंड-आधारित संरचनेत कार्बन-१४ आसोटोपला एम्बेड करून वीज उत्पादित करते. बॅटरीला कोणत्याही देखभालीची गरज नसते.
आयसोटोप हा किरणोत्सर्गी घटक आहे. त्याच्यातून उत्सर्जित होणाऱ्या तीव्र गतीच्या इलेक्ट्रॉन्सना ऊर्जेत परिवर्तित केले जाते.
सिंथेटिक डायमंड संरचना विकिरणास पकडते. सौर सेल्स फोटॉन्सना विजेत रूपांतरित करतात, त्याच पद्धतीने ही प्रक्रिया पार पडते.