नवी दिल्ली : आज देशभरात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे.यंदा प्रजासत्ताक दिनासोबतच भारतीय राज्यघटना लागू झाल्याचा ७५ वा वर्धापन दिनही साजरा केला जात आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली. यानंतर झालेल्या परेडदरम्यान भारताच्या लष्करी सामर्थ्यासह सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन पाहायला मिळाले.
परेडदरम्यान पहिल्यांदाच पाच हजार कलाकारांनी आपली कला सादर केली. यावेळी, 'सुवर्ण भारत: वारसा आणि विकास' या थीमसह सजवलेल्या ३१ चित्ररथांची झलक पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, कर्तव्य पथावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या चित्ररथानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्ररथाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे मोटारसायकलवरून दूध विकणारी मुलगी, जी शेती आणि पशुपालन आता फक्त पुरुषांचे काम राहिलेले नाही. तर महिला देखील हे काम करून चांगला नफा कमवत आहेत, हे दर्शविते.
'सुवर्ण भारत: वारसा आणि विकास' या थीमवर आधारित, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या चित्ररथाच्या पुढील भागात दुधाच्या भांड्यातून वाहणारे श्वेत क्रांती २.० दाखवले आहे. याशिवाय, ते दूध उत्पादनात भारताचे अव्वल स्थान देखील दर्शवते. तसेच, मधल्या भागात, पंढरपुरी म्हैस दाखवली आहे. ही भारतातील ७० हून अधिक देशी म्हशींच्या जातींपैकी एक आहे. या म्हशीची काळजी घेणारी एक महिला शेतकरी दाखवण्यात आली. यासोबतच, एक डॉक्टर देखील दाखवला आहे, ज्यामुळे जनावारांचे आजारापासून संरक्षण होईल.
याशिवाय, दोन महिलांना पारंपारिक पद्धतीने तूप काढताना दाखवण्यात आले. चित्ररथाच्या शेवटच्या भागात कामधेनू किंवा सुरभीचे सजीव चित्र आहे. भारतीय पौराणिक कथांमध्येही या गायीला पवित्र मानले जाते. भारतीय देशी गायींनाही कामधेनूच्या बरोबरीचा दर्जा आहे. हे भारताच्या ग्रामीण समृद्धीचे प्रतीक मानले जातात. या गायींपासून मिळणाऱ्या दूध, तूप आणि दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांवर गावकरी आपला उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत, भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत या गायींची महत्त्वाची भूमिका आहे.