Republic Day 2025: भारत आज ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या दिवसाला खास बनवण्यासाठी कर्तव्य पथावर आयोजित केलेल्या भव्य परेडने देशवासियांना अभिमानाने आणि उत्साहाने भरून टाकले. यंदा प्रजासत्ताक दिनासोबतच भारतीय राज्यघटना लागू झाल्याचा ७५ वा वर्धापन दिनही साजरा केला जात आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली. यानंतर झालेल्या परेडदरम्यान यावेळी पहिल्यांदाच पाच हजार कलाकारांनी एकाच वेळी आपली कला सादर केली.
आज देशभरात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध स्मारकावर पोहोचून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बग्गीत बसून कर्तव्य पथावर आल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी तिसऱ्यांदा राजपथावर तिरंगा फडकवला. यावेळी प्रजासत्ताक दिनाची थीम 'सुवर्ण भारत: वारसा आणि विकास' अशी होती.
परेडची सुरुवात संस्कृती मंत्रालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. ३०० कलाकारांनी वाद्य वाजवत परेडची सुरुवात केली. त्यानंतर इंडोनेशियन लष्करी जवानांची तुकडी कर्तव्य पथावर संचलन केले. भारतीय लष्कराच्या जवानांनी भीष्म टँक, पिनाका मल्टी लाँचर रॉकेट सिस्टिमसह संचलन केले. हवाई दलाच्या फ्लायपास्टमध्ये ४० विमानांनी भाग घेतला. ज्यामध्ये २२ लढाऊ विमाने, ११ वाहतूक विमाने आणि ७ हेलिकॉप्टर सामील होते. अपाचे, राफेल आणि हरक्यूलिस या फ्लाय पास्टचा भाग होते. परेडमध्ये १५ राज्ये आणि १६ मंत्रालयांची झलक पाहायला मिळाली.
यावेळी पहिल्यांदाच ५ हजार कलाकारांनी कर्तव्य पथावर एकाच वेळी सादरीकरण केले. एकाच वेळी पाच हजार कलाकारांनी आपल्या अभिनयाने आणि नृत्याने देशाच्या सांस्कृतिक वारशाची झलक दाखवली. यावेळी सर्व पाहुण्यांना हे दृश्य अनुभवता यावा म्हणून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा विस्तार विजय चौक ते सी-हेक्सागॉनपर्यंत करण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमाला 'जयति जय-जय मम भारतम' असे नाव देण्यात आले. ज्यामध्ये देशाच्या विविध भागांतील कलाकारांनी ४ हून अधिक नृत्यप्रकार सादर केले. ११ मिनिटांचा हा परफॉर्मन्स देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा सन्मान करणाऱ्या भारतीय सांस्कृतिक विविधतेची एक अद्भुत झलक होती.
५ हजार कलाकारांनी वेगवेगळ्या संगीत आणि गाण्यांवर एकत्र सादरीकरण केले, जे खूप कठीण काम होतं. हे पाहून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टाळ्या वाजवल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हात उंचावून या कलाकारांना प्रोत्साहन देत होत्या, तर सर्व केंद्रीय मंत्री उभे राहून या कलाकारांसाठी टाळ्या वाजवत होते.