नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत कुणीतरी मोदी हटाओ, देश बचाओ अशी पोस्टरबाजी केली. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी १०० जणांविरुद्ध एफआयआर दाखल केले आहेत. दिल्लीच्या अनेक परिसरात असे बॅनर झळकले असून त्याचे फोटोही सोशल मीडियातून समोर आले आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शक्यतो जे डिजिटल बॅनर झळकतात, त्या बॅनरवर प्रिंटींग प्रेसचे नाव असते, पण या झळकलेल्या बॅनरवर प्रिंटींग प्रेसचे नाव नाही. माध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार याप्रकरणी ६ जणांना ताब्यातही घेण्यात आलंय.
सेंट्रल दिल्लीच्या दिनदयाल मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचे पोस्टर चिकटवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकणी ताब्यात घेतलेल्या लोकांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी, एका राजकीय पक्षाच्या सांगण्यावरुन हे बॅनर लावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी यात कारवाई केल्याची माहिती मिळताच, विरोधकांना संसदेत हल्लाबोल केला. आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह यांनी लिहिले आहे की, ''मोदी सरकार तानाशाही के चरम पर है, ये वह पोस्टर है, जिसपे १०० एफआयआर हो गई है'', असे सिंह यांनी ट्विटरवरुन म्हटलंय.