दोन राज्यांचे दावे-प्रतिदावे : ओडिशाने दिले १२व्या शतकाचे संदर्भ कोलकाता : रसगुल्ला ही एक बंगाली मिठाई म्हणून जगप्रसिद्ध असली, तरी मुळात दूध नासवून तयार केला जाणारा हा रसभरित पदार्थ कोणाचा? यावरून पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन्ही शेजारी राज्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. अर्थात, ही मिठाई यापैकी कोणाचीही असली, तरी अस्सल खवय्यांच्या दृष्टीने तिचा मनसोक्त आस्वाद घेण्यात काहीच फरक पडणार नाही.ओडिशाने १२ व्या शतकापासूनचे संदर्भ देत, या मिठाईचा भौगोलिक संकेत (जीआय) टॅग फक्त आपल्यालाच मिळायला हवा, असा दावा केला आहे. तर आमची रसगुल्ले बनविण्याची पद्धत व त्याची चव वेगळी असल्याने, ‘जीआय’ संकेत टॅगवर एकट्या ओडिशाला हक्क सांगता येणार नाही, असे पश्चिम बंगालचे म्हणणे आहे. ओडिशाने त्यांचा दावा चेन्नई येथील जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री कार्यालयात दाखल केला आहे. त्याला उत्तर देताना प. बंगालच्या अन्नप्रक्रिया उद्योग विभागाने म्हटले आहे की, ज्या प्रकारे ही मिठाई आमच्या राज्यात तयार केली जाते, ती अन्य राज्यांपेक्षा वेगळी आहे. पश्चिम बंगालचे रसगुल्ले हे गुणवत्तेत उत्कृष्ट आहेत. पश्चिम बंगालने स्पष्ट केले आहे की, आपण या मिठाईवर कोणताही दावा करीत नाही, पण आमच्या राज्यात तयार होणाऱ्या विशेष प्रकारच्या रसगुल्लावर हक्क सांगत आहोत. (वृत्तसंस्था)चहाला दुहेरी टॅगरसगुल्ल्याचा ‘जीआय टॅग’ दोन्ही राज्यांना दिला जाऊ शकतो, याचे उदाहरण देताना प. बंगाल म्हणते की, ‘आमच्याकडे दार्जिलिंग चहा, तर हिमाचल प्रदेशकडे कांगडा चहा आहे. दोन्ही चहाच आहेत, पण त्यांची चव वेगळी आहे. दोन्हींचा जीआय टॅग होऊ शकतो.’पश्चिम बंगालच्या राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘आपण रसगुल्लावर केवळ भौगोलिक संकेतच्या (जीआय) टॅगबाबत आग्रही आहोत.’ एका अधिकाऱ्याने असेही सांगितले की, ‘याबाबत ओडिशासोबत कोणताही वाद नाही. आमच्या रसगुल्लाची जी ओळख आहे, तिची आम्ही सुरक्षा करू इच्छितो. त्यांचे उत्पादन आमच्या उत्पादनापेक्षा रंग, चव आणि बनविण्याच्या पद्धतीत वेगळे आहे.’
रसगुल्ला बंगालचा की ओडिशाचा?
By admin | Updated: July 28, 2016 04:49 IST