ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११ - पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणा-या माणसाचा बदला घेण्यासाठी त्याच्याच बहिणीवर बलात्कार करण्याची परवानगी पंचायत प्रमुखाने दिल्याची धक्कादायक घटना झारखंड येथे घडली आहे. ७ जुलै रोजी १४ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि या सर्व घटनेला संपूर्ण गाव साक्ष आहे.
झारखंडमधील एका गावात एका तरूणाने गावातील एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या महिलेने झालेला प्रकार आपल्या पतीला सांगताच, त्याने या प्रकरणाची तक्रार पंचायतीकडे केली व या कृत्याचा बदला घेण्यासाठी त्या तरूणाच्या बहिणीवर बलात्कार करण्याची परवानगी मागितली. पंचायतीने अजब न्याय देत त्याला परवानगी दिली.
दरम्यान ज्या महिलेवर पीडित तरूणीच्या भावाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तिने या घटनेला दुजोरा दिला. घडलेल्या घटनेबाबत ती महिला म्हणाली, ' त्या मुलीचा भाऊ ६ जुलैला माझ्या घरी आला आणि चाकूचा धाक दाखवत त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी आरडाओरडा केल्यावर तो पळून गेला. घडलेला प्रकार मी माझ्या पतीला कथन केला. दुस-या दिवशी माझ्या नव-याने त्या तरूणाच्या बहिणीला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.'
दरम्यान या सर्व प्रकरणात पंचायतीच्या प्रमुखाचा काही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा ते गावातच नव्हते, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. मात्र इतर गावक-यांनी त्या प्रमुखानेच अत्याचाराला परवानगी दिल्याची साक्ष दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी प्रमुख घोसाल यांच्यासह बलात्कार करणारा आरोपी व पीडित तरूणीच्या भावालाही अटक करण्यात आली आहे.