अयोध्या: राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा थोड्याच वेळात संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या कार्यक्रमाला भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि या नेत्यांचं वय पाहून त्यांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यावरून भाजपाचे माजी खासदार विनय कटियार यांनी नाराजी व्यक्त केली. राम मंदिर आंदोलनात आडवाणी आणि जोशी यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे त्यांनी भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहावं यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज होती, असं मत कटियार यांनी व्यक्त केलं.कोरोना विषाणूचा धोका वाढत असल्याची जाणीव मला आहे. पण तरीही आडवाणी आणि जोशी यांना अयोध्येला आणण्याचे प्रयत्न करायला हवे होते. त्यांना अयोध्येला आणण्याची व्यवस्था करायला हवी होती. त्यांना विशेष विमानानं बोलवायला हवं होतं, असं कटियार म्हणाले. राम मंदिर भूमिपूजनासाठी ९० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती आल्यास त्यांची व्यवस्था करणं अवघड होईल, असं राम मंदिर ट्रस्टकडून कालच सांगितलं गेलं. त्यावर कटियार यांनी भाष्य केलं.माझं वय ६५ वर्ष आहे. मी भूमिपूजन सोहळ्याला जाणार आहे. मात्र माझी व्यवस्था करण्यात यावी. तरच मी अयोध्येला जाईन, असं कटियार म्हणाले. मला पाठदुखीचा त्रास आहे. मी जास्त पायी चालू शकत नाही. त्यामुळे मला फार चालावं लागू नये, अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात यावी, असंदेखील कटियार यांनी पुढे म्हटलं.आडवाणी, जोशींची प्रमुख भूमिकालालकृष्ण आडवाणी यांची राम जन्मभूमी आंदोलनात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढण्यात आली होती. आडवाणी, जोशी यांच्यासह उमा भारती यांचंही राम मंदिर आंदोलनात मोठं योगदान आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी घडलेल्या घटनेनंतर न्यायालयात खटला दाखल झाला. त्यात या तिन्ही नेत्यांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.
Ram Mandir Bhumi Pujan: भूमिपूजनाला आडवाणी, जोशींची अनुपस्थिती; भाजपा नेत्याकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 17:32 IST