उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. दरम्यान, प्रयागराज येथील त्रिवेणी संगमासोबतच अयोध्येतील राम मंदिरामध्येही दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रयागराज येथे पवित्र स्नान केल्यानंतर भाविक अयोध्येत रामललांच्या दर्शनासाठी येत असल्याने राम मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अयोध्येमध्ये राष्ट्रीय महामार्गापासून राम मंदिर गेट, हनुमानगढीसह अयोध्येतील पौराणिक मठ आणि मंदिरांमध्ये सुमारे तीन किमी पर्यंत लांब रांगा लागल्या आहेत.
भाविक या लांबच लांब रांगांमध्ये उभे राहून अयोध्येतील मठ आणि मंदिरांमध्ये दर्शन घेत आहेत. तसेच अयोध्येच्या सीमेवरही वाहतूक कोंडी झाल्याचं दिसत आहे. अयोध्येमधून रायबरेली रोड असो वा अयोध्या ते प्रयागराज रोड असो अयोध्येकडे येणाक्या सर्व मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रविवारीही अयोध्येमध्ये मोठ्या संख्येने भाविक आले होते. तसेच अयोध्येला जोडणाऱ्या प्रयागराज, लखनौ, रायबरेली, गोरखपूर, गोंडा, आंबेडकरनगर महामार्गांवर भाविकांची वाहनं काही काळासाठी थांबवण्यात आली होती. भाविकांची सर्वाधिक वर्दळ ही प्रयागराज रायबरेली महामार्गावर दिसून येत आहे.
एसपी सिटी मधुबन सिंह यांनी सांगितले की, अयोध्येमध्ये भाविकांसी संख्या सातत्याने वाढत आहेत अयोध्येमध्ये येत असलेल्या प्रत्येक भाविकाच्या आस्थेचं केंद्र राम मंदिर आणि हनुमानगढी आहे. त्यामुळे सर्वाधिक गर्दी इथेच होत आहे. राम मंदिराचा प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग वेगवेगळे करून गर्दीला नियंत्रित केलं जात आहे. मात्र संपूर्ण राम पथावरून तीन किलोमीटर अंतर भाविक चालत जाऊन पार करत आहेत.