पिकनिकसाठी राजस्थानच्या जयपूरहून टोंकमध्ये आलेल्या ११ तरुणांसोबत भयावह घटना घडली आहे. बनास नदीत अंघोळीसाठी उतरलेले हे ११ जण वाहून गेले आहेत. यापैकी आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
बनास नदीमध्ये हे ११ तरुण अंघोळीसाठी उतरले होते. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण बुडाले आहेत.दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे. बनास नदीच्या एका जुन्या पुलापाशी हे तरुण पिकनिकसाठी आले होते.
स्थानिकांनुसार सर्वजण एकत्रच पाण्यात उतरले होते. परंतू, काही वेळातच पाण्याचा वेग वाढला आणि सर्वजण एकामागोमाग एक पाण्यात खेचले गेले. स्थानिकांनी आरडाओरडा करत पोलिसांना याची माहिती दिली. टोंक पोलीस आणि एसडीआरएफची टीम तिथे पोहोचली परंतू तोवर उशीर झाला होता. या तरुणांना शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी ८ तरुणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून तीन जणांचा शोध सुरु आहे.
या सर्वांना सआदत ह़ॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून त्यांच्या कुटुंबियांना देखील कळविण्यात येत आहे. डॉक्टरांनी या सर्व आठही जणांना मृत घोषित केले आहे. गावकऱ्यांनुसार ज्या भागात ते उतरले होते तो खोलगट आहे. यामुळे अनेकजण तिथे बुडालेले आहेत. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने मृतांचे नातेवाईक, स्थानिक जमा झालेले आहेत. सर्वजण जयपूरचे असल्याचे सांगितले जात आहे.
मृतांमध्ये नौशाद (वय 35, रा. हसनपुरा), कासीम, रा. हसनपुरा, फरहान, रा. हसनपुरा, रिजवान (26, रा. घाटगेट), नवाब खान (28, रा. पानीपेच कच्ची बस्ती, बल्लू, रा. घाटगेट), साजिद (20, रा. घाटगेट), साजिद (20) रा. (30, रा. रामगंज बाजार) यांचा मृत्यू झाला, तर शाहरुख (30, रा. घाटगेट), सलमान (26, रा. घाटगेट), समीर (32, रा. घाटगेट) यांचा समावेश आहे.