हनिमूनसाठी मेघालय येथे गेलेल्या इंदूर राजा रघुवंशी याची त्याच्याच पत्नीने हत्या केल्याच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. तेव्हापासून राजा रघुवंशी याचं कुटुंब प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलेलं आहे. आता हेच कुटुंब एका सनसनाटी दाव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचं झालं असं की, राजा रघुवंशी याचा भाऊ सचिन रघुवंशी याच्या कथित पत्नीने त्याच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. आपल्या दीड वर्षांच्या मुलाचा डीएनए अहवाल माध्यमांसमोर ठेवत या मुलाचा बाप सचिन रघुवंशीच आहे, असा दावा तिने केला आहे.
सचिन रघुवंशी याची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या या महिलेने प्रसारमाध्यमांसमोर येत सांगितले की, आता डीएनएचा अहवाल समोर आला आहे. आता रघुवंशी कुटुंबाला उत्तर द्यावं लागणार आहे. माझ्या मुलाला जाणीवपूर्वक नाकारलं गेलं. हा केवळ माझाच नाही, तर माझ्या मुलाचाही अपमान आहे, असे या महिलेने म्हटले आहे.
या महिलेने पुढे सांगितले की, ‘’सचिन रघुवंशीसोबत माझ्या झालेल्या विवाहाचे फोटो, व्हिडीओ आणि मंदिरात झालेल्या विधींचे पुरावे माझ्याकडे आहेत’’. दरम्यान, या महिलेने या संदर्भातील व्हिडीओ प्रसारमाध्यमांना दाखवले. तसेच सचिनने व्यवस्थित लग्न केलं असतं तर आपल्याला हे दिवस पाहावे लागले नसते असा दावा केला.
या प्रकरणात मी कोर्टात धाव घेतली आहे. मात्र प्रत्येक वेळी या कुटुंबाने माझी उपेक्षा आणि अपमान केला आहे. आज माझा मुलगा वणवण भटकतोय. सचिनला या साऱ्याची उत्तरं द्यावी लागतील. आता प्रकरण कोर्टात आहे. तसेच तिथून मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. सचिनला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा मिळेल आणि माझ्या मुलाला त्याची ओळख आणि हक्क मिळेल, अशी आशाही या महिलेने व्यक्त केली आहे. दरम्यान, राजा रघुवंशी हत्या प्रकरणामुळे आधीपासूनच चर्चेत असलेलं रघुवंशी कुटुंब या प्रकारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.