बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे भिजलेल्या चलनी नोटा उन्हात वाळविण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना स्थानिक लोकांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री रेणुका यल्लम्मा मंदिराच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने दैना उडवली होती. मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण परिसरात पाणी साचले आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात मोठा गोंधळ उडाला. दानपेटीतही पाणी शिरल्याने हजारो रुपयांच्या चलनी नोटा ओल्या झाल्या. आता या नोटा सुकवण्याचे काम मंदिराचे कर्मचारी युद्धपातळीवर करत आहेत.ढगफुटीसदृश पावसामुळे शहराचे रस्ते तलावांमध्ये रूपांतरित झाले. सौंदत्तीहून यल्लम्मा डोंगराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, झाडे उन्मळून पडली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भिजलेल्या नोटांना कुंकू, अक्षता आणि फुलांचा रंग लागल्याने त्या पिवळ्या झाल्या. मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दानपेट्या फोडून या ओल्या नोटा बाहेर काढल्या आणि त्या वाळवण्यासाठी मंदिराच्या आवारात पसरवल्या. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिर प्रशासनाने तातडीने पावले उचलली. मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
सौंदत्तीच्या यल्लम्मा मंदिरात पावसात भिजलेल्या नोटा वाळवल्या!, ढगफुटीसदृश पावसाने उडाली होती दैना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:56 IST