नवी दिल्ली: राहुल गांधी यांच्या राजकारणाची पद्धत लोकशाहीशी सुसंगत नसल्यामुळेच काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात अडथळे आणण्यात आले, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक शुक्रवारी दिल्लीत पार पडली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी प्रसारमाध्यमांना या बैठकीत काय झाले, याचा तपशील पुरवला. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आगामी काळात राफेल डीलविषयक आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचे याची रणनीती निश्चित करण्यात आली. अमित शाह यांनी म्हटले की, राफेल विमान खरेदी व्यवहारातले महत्त्वाचे मुद्दे आम्ही सांगितले आहेत व भविष्यातही सांगू. मात्र, या व्यवहारातील प्रत्येक घटकावर चर्चा करता येणे शक्य नाही. ते देशहिताला कितपत धरून होईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. मात्र, या मुद्द्यावरून राहुल गांधी ज्याप्रकारे राजकारण करत आहेत, ते लोकशाहीला धरून नाही. त्यामुळेच काँग्रेस खासदारांकडून मोदींच्या भाषणात व्यत्यय आणण्याचे प्रकार घडले, असा आरोप अमित शाहांनी बैठकीत केला.
राहुल यांचे वर्तन लोकशाहीला धरून नाही- अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 12:44 IST