Rahul Gandhi On Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादल्यानंतर, भारताच्या अर्थव्यवस्थेला 'मृत' म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही ट्रम्प वादग्रस्त विधानावरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, ट्रम्प यांच्या हो ला हो लावत, भारताची अर्थव्यवस्था मृत झाल्याची टीका केली.
राहुल गांधी यांनी गुरुवारी (३१ जुलै २०२५) संसदेच्या संकुलात मीडियाशी संवाद साधताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले. राहुल गांधी म्हणाले की, "'ट्रम्प यांचे विधान सत्य प्रतिबिंबित करते. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांशिवाय सर्वांना हे माहित आहे की, भारतीय अर्थव्यवस्था मृत अर्थव्यवस्था आहे. मला आनंद आहे की, ट्रम्प यांनी ही वस्तुस्थिती मांडली. संपूर्ण जगाला माहित आहे की, भारतीय अर्थव्यवस्था मृत आहे. अदानींना मदत करण्यासाठी भाजपने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. मात्र, भारत सरकार हे स्वीकारणार नाही," अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.
'तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'याशिवाय, राहुल गांधींनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींवर भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. त्यांनी लिहिले, "भारतीय अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहे. पंतप्रधान मोदींनी अदानी-मोदी भागीदारी, नोटाबंदी आणि दोषपूर्ण जीएसटीने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. 'असेंब्ली इन इंडिया' अयशस्वी झाली, एमएसएमई नष्ट केले, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले, त्यांनी भारतातील तरुणांचे भविष्यही उद्ध्वस्त केले आहे."
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ?डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केल्यानंतर राहुल गांधी यांचे हे विधान आले आहे. रशियासोबतच्या भारताच्या व्यापार संबंधांवर टीका करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी म्हटले की, भारत रशियाशी काय व्यवहार करतो, याची मला पर्वा नाही. मात्र, दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहेत, अशी टीका ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केली.