Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक राज्यांनाही युद्धसज्जतेच्या दृष्टीने ७ मे रोजी 'मॉक ड्रिल' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले. यानंतर आता अनेक ठिकाणी याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या भ्याड हल्ल्यात जीव गमावलेल्या शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
तत्पूर्वी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी अचानक पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असताना आणि देशाला युद्ध सज्जतेचा इशारा दिलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली गेली. तर मंगळवारी राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले.
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले
यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत याची माहिती दिली. राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, पहलगाम हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. प्रचंड दुःखाच्या वेळीही त्यांचे धाडस आणि शौर्य राष्ट्रासाठी एक संदेश आहे की, आपल्याला एकजूट राहिले पाहिजे. संपूर्ण देश या कुटुंबियांसोबत उभा आहे. सरकारला विरोधी पक्षांचा पूर्ण पाठिंबा आहे. दोषींना अशी शिक्षा झाली पाहिजे की, कोणीही भारताकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही. आज संपूर्ण देश पीडित कुटुंबांसह न्यायाची वाट पाहत आहे.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया भक्कमपणे भारताच्या पाठीशी असल्याची हमी त्यांनी दिली. पहलगाम हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शासन करून न्याय व्हायलाच हवा, असे पुतिन म्हणाले.