Rahul Gandhi: पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तदाखल करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर सध्या लोकसभेच्या पावसाळी अधिवशेनात चर्चा सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदार ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सहभागी झाले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पालक गमावलेल्या सुमारे दोन डझन मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात या मुलांनी आपले नातेवाईक गमावले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महिनाभर पाकिस्तान आणि भारत यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली जात होती. त्या दरम्यान सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली. यानंतर आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पाकिस्तानच्या गोळीबारात पालक गमावलेल्या २२ मुलांना दत्तक घेण्याचा एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष तारिक हमीद कर्रा यांनी ही माहिती दिली. तारिक कर्रा म्हणाले की, "राहुल गांधी पूंछ जिल्ह्यातील २२ मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलतील. ही ती मुले आहेत ज्यांनी त्यांचे पालक किंवा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य गमावला आहे. या मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून मदतीच्या रकमेचा पहिला हप्ता बुधवारी देण्यात येईल. मुले पदवीधर होईपर्यंत ही मदत सुरू राहील.
राहुल गांधी यांनी मे महिन्यात पूंछला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी त्यांच्या स्थानिक नेत्यांना या हल्ल्यानंतर पालक गमावलेल्या मुलांची यादी तयार करण्यास सांगितले होते. त्यानंतर सर्वेक्षण करुन सरकारी नोंदींची तपासणी करण्यात आली आणि यादी तयार करण्यात आली.
ऑपरेशन सिंदूरनंतर सातत्याने सीमेपलीकडून गोळीबार सुरु होता. पाकिस्तानकडून होणाऱ्या जोरदार गोळीबाराचा सर्वाधिक फटका पूंछ शहराला बसला. धार्मिक शाळा झिया उल उलूमवर झालेल्या हल्ल्यात अर्धा डझनहून अधिक मुले जखमी झाली. कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी जात असताना गोळीबारात विहान भार्गव नावाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.