नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खोचक टोला हाणला आहे. सुमित्रा महाजन यांनी एकीकडे प्रियंका गांधी यांचे कौतुक केले, तर दुसरीकडे राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे.
प्रियंका गांधी यांचे स्वागत करत सुमित्रा महाजन म्हणाल्या की, ''प्रियंका गांधी एक चांगल्या महिला आहेत. पण आपण एकट्यानं राजकारण करू शकत नाही, हे राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. त्यामुळेच राहुल गांधी प्रियंका यांची मदत घेत आहेत. ही चांगली बाब आहे''.
बुधवारी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी त्यांना सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली आहे. मोदी सरकारला लोकसभा निवडणुकांत रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी काढलेले हे ब्रह्मास्त्र असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे काँग्रेसचे नेते, तळागाळातील कार्यकर्तेही प्रचंड आनंदात असून, भाजपाने अपेक्षेप्रमाणेच नेहरू-गांधी घराणेशाहीचे हे आणखी एक उदाहरण आहे, अशी टीका केली आहे.
यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी हल्ली आजारी असतात. त्यामुळे राहुल गांधी यांना प्रियंका यांची मोठी मदत होईल. प्रियंका कदाचित अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूकही लढवतील. त्यामुळे राहुल अमेठीऐवजी रायबरेलीमधून निवडणूक लढवतील, असे सांगण्यात येत आहे. प्रियंका यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय या आधीच घेतला होता आणि त्यामुळे त्या अलीकडे काँग्रेसच्या अनेक बैठकांनाही हजर राहत होत्या. स्वत: राहुल गांधी यांची प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाचा काँग्रेसला फायदा होईल, असे म्हटले आहे.