नवी दिल्ली : राफेल विमाने खरेदी प्रकरणासंदर्भात दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा काँग्रेसचा डाव होता. जनतेची दिशाभूल केल्याबद्दल काँग्रेसने माफी मागितली पाहिजे.राफेल खरेदीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला गुरुवारी क्लीन चिट दिली. या व्यवहाराबद्दल १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिका तथ्यहीन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह म्हणाले की, स्वच्छ प्रतिमेच्या व प्रामाणिक वृत्तीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने राफेल खरेदी व्यवहारप्रकरणी राळ उडविली होती. अशा खोट्या प्रचाराबद्दल देशातील जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही. आता काँग्रेसने माफी मागायला हवी. राजनाथसिंह म्हणाले की, राफेल विमाने खरेदीबाबत काही राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे होते. अशा प्रकारे वक्तव्ये करणाऱ्या राजकीय नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. अत्याधुनिक विमानांची तातडीची गरज लक्षात घेऊन राफेल विमानांची खरेदी पारदर्शक पद्धतीने करण्यात आली.>बदनामीचा प्रकार फसला : अमित शहाभाजपचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे काँग्रेसने केवळ बदनामीसाठी हे केले होते, हे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. बदनामी मोहिमेत तथ्य असल्याचे न्यायालयानेच स्पष्टपणे म्हटले असून, बदनामीचा हा प्रकार निकालाने फसल्याचे सिद्ध झाले, असेही ते म्हणाले.
''पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी राफेलप्रकरणी खोटेनाटे आरोप''
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 04:53 IST