नवी दिल्ली- राफेल डीलवरून मोदी सरकारवर काँग्रेस वारंवार टीका करत असताना आता मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनंही या प्रकरणावरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे खासदार आणि वरिष्ठ नेते संजय राऊतराफेल डीलवरून मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राफेल घोटाळा हा बोफोर्स घोटाळ्याचा बाप असल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणावर वारंवार आवाज उठवल्यामुळे राजकारणात त्यांचा स्तर उंचावला आहे. सामनातूनही संजय राऊत यांनी मोदींना खडे बोल सुनावले आहेत.बोफोर्स घोटाळ्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या कुटुंबीयांनी 65 कोटींची लाच घेतल्याचा आरोप करणारे आता सत्तेत आहेत. त्यांच्यावर आज राफेल विमान डीलमध्ये 700 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळेच घोटाळ्यांच्या बाबतीत राफेल हा बोफोर्सचा बाप आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती यांच्यावर काँग्रेस अध्यक्ष समर्थक म्हणून शिक्कामोर्तब केलं जाईल की त्यांना राष्ट्र विरोधी म्हटलं जाईल, हाही मला प्रश्न पडला आहे.फ्रान्स मीडियानुसार, 21 सप्टेंबरला ओलांद यांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं होतं की, भारत सरकारनं राफेल विमानं तयार करणा-या दसॉल्ट एव्हिएशनच्या 58 हजार कोटी रुपयांच्या करारासाठी रिलायन्सचं नाव सुचवलं होतं. त्यामुळे फ्रान्सकडे ते नाव स्वीकारण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. संजय राऊत म्हणाले, विषय हा नाही की अनिल अंबानींना राफेल करारात समाविष्ट करून घेतले. तर प्रत्येक विमानासाठी 527 कोटी रुपयांच्या मूल्याऐवजी मोदी सरकारच्या कार्यकाळात हा करार 1570 कोटी रुपयांमध्ये करण्यात आला. त्यामुळे या प्रत्येक विमानात 1 हजार कोटींची दलाली मिळाली. तसेच विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत असल्याच्या भाजपाच्या टीकेलाही त्यांनी हास्यास्पद म्हटलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी राहुल गांधींवर स्तुतिसुमनंही उधळली आहेत. तसेच भाजपानं अनेक खोटी आश्वासनं दिली आहेत. ती अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाहीत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
Rafale Controversy: राफेल घोटाळा हा बोफोर्सचाही बाप, शिवसेनेची मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 14:02 IST