बंगळुरू/चेन्नई : मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता दोषी आढळल्यानंतर द्रविड- अण्णा द्रमुक पक्ष कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या चकमकीप्रकरणी द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी आणि पार्टीचे खजीनदार एम. के. स्टॅलिन यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या दोघांसह अन्य कार्यकर्त्यांवर काल रात्री अण्णाद्रमुक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे रोयपेट्टा ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. करुणानिधी यांच्या गोपालपुरमस्थित निवासस्थानाजवळ द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप अण्णाद्रमुक कार्यकर्त्यांनी केला होता. आरोपींविरुद्ध १४७, १४८, ३२४, ३३६ आणि ५०६/२ अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. अण्णाद्रमुक कार्यकर्त्यांनी द्रमुक पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध घोषणाबाजी सुरू करताच वादाला तोंड फुटले होते. ६६.६५ कोटींच्या अपसंपदेचे प्रकरण द्रमुक नेत्यांनी थोपविल्यामुळेच काल विशेष न्यायालयाने जयललिता यांना दोषी ठरवल्याचा अण्णाद्रमुक समर्थकांचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)
द्रमुक-अण्णाद्रमुक यांच्यात राडा
By admin | Updated: September 29, 2014 06:06 IST