Qatar Emir on India Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्वतः विमानतळावर जाऊन कतारचे अमीर यांचे स्वागत केले. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. कतारचे अमीर सोमवारी रात्री परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेतील. यानंतर मंगळवारी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील.
कतारचे अमीर यापूर्वी ते 2015 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते -कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी ते 2015 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी, पराष्ट्रमंत्रालयाने शनिवारी एक निवेदनात म्हटले होते की, "त्यांच्या भेटीमुळे विविध क्षेत्रातील आमच्या वाढत्या भागीदारीला आणखी गती मिळेल." कतारच्या अमीरांच्या १७-१८ फेब्रुवारीच्या दौऱ्यासाठी, मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिकांचे शिष्टमंडळही भारत दौऱ्यावर आहे.
पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक -परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर अल-थानी यांची भेट घेतील. मंगळवारी सकाळी, कतारचे अमीर यांचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत केले जाईल. यानंतर ते 'हैदराबाद हाऊस' येथे पंतप्रधान मोदींची भेट घेतील. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली जाईल.
PM मोदींच्या निमंत्रणावरून अल-थानी भारत दौऱ्यावर -यानंतर, मंगळवारी दुपारी सामंजस्य करारांची देवाणघेवाण होईल. त्यानंतर अमीर राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतील. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून अल-थानी भारत दौऱ्यावर आले आहेत.