'पुष्पा 2: द राइज' या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने त्यांच्या लेकीला आईच्या मृत्यूची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. ४ डिसेंबरची घटना आणि पोलीस केससाठी मी तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला जबाबदार धरत नाही. या प्रकरणातील केस मागे घेण्यास तयार आहे. अल्लू अर्जुनचा आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळत आहे असं देखील महिलेचा पती भास्कर यांनी म्हटलं आहे.
मुलाची प्रकृती चिंताजनक आहे, मुलगा अजूनही कोमात आहे आणि रुग्णालयात दाखल आहे, आपल्या मुलाच्या उपचाराबाबत अभिनेत्याचं पूर्ण सहकार्य मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. "मुलगा ८ वर्षांचा आहे, तो गेल्या २० दिवसांपासून कोमात आहे. त्याची प्रकृती अत्यंत वाईट आहे. कधी कधी रुग्णालयामध्ये डोळे उघडतो आणि मग पुन्हा बंद करतो."
"धक्कादायक गोष्ट म्हणजे तो कोणालाही ओळखत नाही. माझा मुलगा अल्लू अर्जुनचा फॅन आहे. त्याच्या आग्रहामुळे पत्नीला सिनेमागृहात जावं लागलं. त्यामुळेच ही दुर्घटना घडली. उपचारासाठी किती वेळ लागेल हे आम्हाला माहीत नाही. आमच्या मुलीला तिच्या आईच्या मृत्यूची माहिती देण्यात आलेली नाही. आई गावी गेली आहे असं सांगितलं" असंही भास्कर यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधताना म्हटलं आहे.
अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी ४ डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या महिलेच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. निर्माते नवीन यरनेनी मृत महिलेच्या आठ वर्षांच्या मुलावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात पोहोचले आणि कुटुंबाला धनादेश सुपूर्द केला. महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना त्यांनी पत्रकारांना महिलेच्या कुटुंबाला मदत करायची असल्याने हा धनादेश सुपूर्द केल्याचं सांगितलं.