गुगल आणि मेटा या दोन कंपन्यांच्या अडचणी वाढणार आहेत. ईडीने या दोन कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस ऑनलाइन बेटिंग अॅप्सशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीसंदर्भात बजावली आहे. या दोन्ही कंपन्यांनी बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या जाहिराती आणि वेबसाइटना महत्त्व दिल्याचा आरोप ईडीने केला आहे.
गुगल आणि मेटावर या बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याचा आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन बेटिंग जाहिराती आणि वेबसाइट्स ठळकपणे ठेवल्याचा आरोप आहे. आता ईडीने दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना २१ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
पहिल्यांदाच टेक कंपनीला धरले जबाबदार
बेटिंग प्रकरणात पहिल्यांदाच भारतात काम करणाऱ्या मोठ्या टेक कंपनीला थेट जबाबदार धरले आहे. ईडीची ही कारवाई ऑनलाइन बेटिंगविरुद्धच्या व्यापक मोहिमेचा एक भाग आहे, यामध्ये अनेक मोठ्या नावांची आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची भूमिका तपासली जात आहे.
ऑनलाइन बेटिंग प्रकरणी आता ईडीने तपास वाढवल्याचे दिसत आहे. याआधीही अनेक चित्रपट तारे आणि सोशल मीडिया प्रभावक बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिल्याबद्दल चौकशीच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
ईडी ऑनलाइन बेटिंग अॅप्सच्या एका मोठ्या नेटवर्कची बारकाईने चौकशी करत आहे. यापैकी बरेच अॅप्स प्रत्यक्षात स्वतःला 'कौशल्य आधारित गेम' म्हणवून बेकायदेशीर बेटिंग करत असल्याचे दिसत आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा कमावला आहे.
मागील आठवड्यात ईडीने प्रसिद्ध अभिनेते, टीव्ही होस्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसह २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. ईडीने अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली.