मजुरांच्या बसवरून प्रियांका गांधी- योगी आदित्यनाथ संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:13 AM2020-05-20T01:13:30+5:302020-05-20T01:14:07+5:30

मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत.

Priyanka Gandhi-Yogi Adityanath struggle from the labor bus | मजुरांच्या बसवरून प्रियांका गांधी- योगी आदित्यनाथ संघर्ष

मजुरांच्या बसवरून प्रियांका गांधी- योगी आदित्यनाथ संघर्ष

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांना गावी पाठविण्यासाठी बसेस चालविण्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात राजकीय संघर्ष जुंपला आहे. या मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत. तथापि, उत्तर प्रदेश सरकार काँग्रेसला यासाठी परवानगी देण्यास कचरत आहे. या मुद्यांवरून काँग्रेस आणि उत्तर प्रदेश सरकारदरम्यान कोंडी कायम असताना प्रियांका गांधी यांचे खाजगी सचिव संदीप सिंह यांनी आज मंगळवारी उत्तर प्रदेशच्या गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांना पत्र पाठवून सर्व बसेस चालविण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने भूमिका बदलत मंगळवारी रात्री पत्र पाठवून काँग्रेसला बसगाड्यांचे नंबर, चालक आदीची तपशीलवार माहिती देण्यास सांगितले. काँग्रेसकडून ही माहिती देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने एक हजार बसेस लखनौला पाठविण्यास सांगितले. प्रियांका गांधी यांनीही तातडीने सरकारला पत्र पाठवून कळविले की, एवढ्या कमी वेळेत बसेस लखनौला पोहोचू शकत नाहीत.



बसेस नॉयडा, गाझियाबादला पाठविता येतील.
उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनीही या मुद्यावरून राज्य सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप केला. सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. राजकारण खेळण्यासाठी जाणूनबुजून वाहनांचे नंबर खोटे असल्याचे भासविण्यात आले. आम्ही बससेचे नंबर सार्वजनिक करू शकतो, सरकारने हवी तर शहानिशा करावी, असेही ते म्हणाले.
काँग्रेस आणि राज्य सरकारदरम्यान सोमवारी रात्री २.१० वाजेपर्यंत पत्रव्यवहार सुरू होता. त्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे. अतिरिक्त मुख्य गृहसचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी दिलेली सर्व पत्रे काँग्रेस सोशल मीडियावरून सार्वजनिक करीत आहेत. बसेस सध्या उंचा नगला, आग्रा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर परवानगीच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत.

आरोप-प्रत्यारोप
स्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करण्यावरून राज्य सरकार आणि काँग्रेसदरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या मुद्यावरून काँग्रेस राजकारण करीत आहे, असा आरोप उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केला.
ते म्हणाले की, काँग्रेसने दिलेल्या बसेसच्या यादीबाबत शहानिशा केली असता त्यात दुचाकी वाहने, आॅटो, मालवाहक गाड्यांचा समावेश असल्याचे कळले. ही बाब दुर्दैवी आहे. अशी फसवणूक कशासाठी? याचे काँग्रेस अध्यक्षांनी उत्तर दिले पाहिजे.

Web Title: Priyanka Gandhi-Yogi Adityanath struggle from the labor bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.