Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. कदाचित अरविंद केजरीवाल निवडणूक जिंकतील, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. मात्र, काँग्रेसही रिंगणात असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. अशातच पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मिडिया पोस्टमधून त्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्लीत काँग्रेस विजयी होईल असा विश्वास असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून देशभरात राजकारण तापले असताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले. तिथे अरविंद केजरीवाल जिंकतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं. दिल्लीच्या राजकारणावर चर्चा करताना चव्हाण यांनी काँग्रेसच्या भूमिकेवरही भर दिला. काँग्रेसही या निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यात युती असती तर त्याचा परिणाम आणखी चांगला होऊ शकला असता, असे त्यांनी मान्य केले. मात्र दिल्लीत केजरीवाल यांच्या विजयाबाबत चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं.
"दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर विजय निश्चित होता. आता सर्व प्रमुख पक्ष रिंगणात उतरल्याने खुली निवडणूक झाली आहे. काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली असून आपण विजयी होऊ असा मला विश्वास आहे," असं स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
"दिल्लीची निवडणूक ही खूप महत्त्वाची निवडणूक आहे. मला वाटतं कदाचित केजरीवाल तिथे जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे, काँग्रेसही निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस आणि आप यांच्यात युती झाली असती तर बरे झाले असते, पण कदाचित तसे होणार नाही. इथे बसून दिल्लीत काय चालले आहे हे सांगणे कठीण होईल," असं पृथ्वीराज चव्हाण यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान,अरविंद केजरीवाल यांना इंडिया आघाडीचे तीन प्रमुख पक्ष समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांचा पाठिंबा मिळाला आहे.