इम्फाळ/चुराचंदपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १३ सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देतील अशी शक्यता आहे. सध्या इम्फाळमधील कांगला किल्ल्यावर पंतप्रधानांच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या संभाव्य मणिपूर दौऱ्यासाठी भव्य स्टेज बांधण्यात येत आहे. या परिसरात साफसफाई आणि रंगरंगोटीचे कामही सुरू आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
किल्ल्यातील बांधकाम आणि साफसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी कामाचा उद्देश नमूद केला नाही. याचबरोबर चुराचंदपूर जिल्हा मुख्यालयातील शांती मैदानावरही असेच काम सुरू आहे, असे सांगण्यात आले.
१५००० लोकांची बैठक व्यवस्था
इम्फाळमधील कांगला किल्ला हा माजी मणिपुरी शासकांच्या पारंपरिक सत्तेचे केंद्र राहिला आहे. सध्या कांगला किल्ल्यामध्ये एका भव्य स्टेजचे बांधकाम सुरू आहे. स्टेजसमोर १५,००० हून अधिक लोकांना बसण्याची व्यवस्था केली जात आहे.
इतर ठिकाणीही कामे
इम्फाळ विमानतळ आणि कांगला किल्ल्यामधील सात किमीच्या मार्गावर दुभाजक रंगवणे, झाडांची छाटणी केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आम्हाला पंतप्रधानांच्या भेटीबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी सांगितले.