श्रीनगर: हिमवृष्टीमुळे रस्त्यात अडकलेल्या गर्भवतीला लष्कराच्या जवानांनी सुखरुपपणे रुग्णालयात दाखल केलं. जवानांनी योग्य वेळी मदत केल्यानं महिला रुग्णालयात पोहोचली. त्यानंतर तिनं जुळ्यांना जन्म दिला. या मदतीबद्दल महिलेनं लष्कराच्या जवानांचे आभार मानले. काश्मीरच्या बांदिपोरात ही घटना घडली.बांदिपोरातल्या लष्करी तळावर एका ग्रामस्थानं शुक्रवारी कॉल केला. प्रचंड हिमवृष्टी सुरू असल्यानं पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी मदत करा, असं आवाहन ग्रामस्थानं लष्कराला केलं. त्यानंतर जवान ग्रामस्थाच्या पत्नीच्या मदतीला धावले. त्यावेळी जोरदार हिमवृष्टीमुळे बांदिपोरातील तापमान उणे सात अंश सेल्सिअस होतं. 'बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक ठप्प होती. मात्र महिलेला काहीही करुन रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं,' अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामस्थाच्या फोन कॉलनंतर लष्करानं सूत्रं हलवली. रस्ते वाहतूक ठप्प असल्यानं बांदिपोरा राष्ट्रीय रायफल्सचे जवान चालत महिलेच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी महिलेला स्ट्रेचरवर ठेवलं आणि अडीच किलोमीटरचं अंतर पायी कापलं. यावेळी रस्त्यावर जवळपास कमरेइतका बर्फ साचला होता. यानंतर महिलेला लष्कराच्या रुग्णवाहिकेतून बांदिपोरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. परिस्थिती नाजूक असल्यानं आम्ही प्रशासनाशी संवाद साधला. लष्कर आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे महिला रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात आले. तिथे या महिलेनं जुळ्यांना जन्म दिल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सलाम! हिमवृष्टीत अडकलेल्या गर्भवतीच्या मदतीसाठी धावले लष्कराचे जवान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 14:48 IST