हरियाणातील पंचकुला येथे कारमध्ये प्रवीण मित्तल यांनी आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी सतत नवनवीन खुलासे होत आहेत. आता कुटुंबाच्या जवळच्या लोकांनी प्रवीण मित्तल आणि कुटुंबावर तब्बल २० कोटी रुपयांचं कर्ज होतं असं म्हटलं आहे. प्रवीण मित्तल हे हरियाणातील हिसार जिल्ह्यातील बरवाला येथील रहिवासी होते. ते बराच काळ पंचकुला येथे राहत होते आणि येथे टॅक्सी चालक म्हणूनही काम करत होते. मेहनतीने त्यांनी पुढे प्रगती केली आणि टूर अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरू केला. नंतर व्यवसाय वाढवायला सुरुवात केली पण गेल्या काही वर्षांत कुटुंब कर्जात बुडत राहिले.
परिस्थिती इतकी बिकट झाली की, त्यांच्याकडे जगण्यासाठी पैसे नव्हते आणि कर्ज २० कोटींवर पोहोचलं. यामुळे प्रवीण मित्तल आणि कुटुंब नैराश्यात गेलं. शेवटी मुलांसह सर्वांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. कारमध्येच सर्वांनी विषप्राशन केलं. प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, पालक आणि तीन मुलांचा यामध्ये मृत्यू झाला. प्रवीण मित्तल यांनी एक चिठ्ठीही लिहिली आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, त्यांचा भाचा संदीप अग्रवाल त्यांचे अंतिम संस्कार करतील. काही वर्षांपूर्वी मित्तल यांनी हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे स्क्रॅप फॅक्टरी सुरू केली. यासाठी लोन घेतलं होतं.
कर्जाचा डोंगर वाढला
कर्ज न फेडल्यामुळे बँकेने ते सीझ केलं. त्यानंतर ते पंचकुला सोडून डेहराडूनला गेले. अनेक वर्षांपासून ते कुटुंबातील इतर सदस्यांशी संपर्कात नव्हते. गेल्या ६ वर्षापासून ते डेहराडूनमध्ये स्थायिक होते. या काळात प्रवीण मित्तल यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही. त्याच वेळी त्यांचं कर्ज वाढतच गेलं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबासह डेहराडून सोडलं आणि पंजाबमधील खरार येथे आणि नंतर हरियाणातील पिंजोर येथे त्यांच्या सासरच्या घरी राहिले. अखेर एका महिन्यापूर्वी पंचकुला येथे परतले. कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने मित्तल यांचे दोन फ्लॅट आणि गाड्या सीझ केल्या होत्या.
विषप्राशन केल्यानंतर सर्वांना झाल्या उलट्या
सोमवारी संपूर्ण कुटुंब बाबा बागेश्वर यांच्या एका कार्यक्रमात गेले होते. तिथून परतताना सर्वांनी विषप्राशन केलं. घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितलं की कारमधील सर्वांना उलट्या होत होत्या. विषप्राशन केल्यानंतर सर्वांना उलट्या झाल्या होत्या, त्यानंतर ते एकमेकांवर पडले होते. कारमधून दुर्गंधी येत होती. ६ जणांचा आधीच मृत्यू झाला होता, तर प्रवीण मित्तल विषप्राशन केल्यानंतर ५ मिनिटं कारच्या बाहेर फूटपाथवर बसून राहिले. याच दरम्यान त्यांनी एका व्यक्तीला सांगितलं की, आम्ही सर्वांनी विषप्राशन केलं आहे. सर्व नातेवाईक करोडपती आहेत, पण कोणीही मदत केली नाही असंही सांगितलं.