श्रीनगर - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा सतर्क आहे. त्यातच गुप्तचर विभागाकडून आणखी एक रिपोर्ट आला आहे. त्यात पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या द रेजिस्टेंट फॉर्स या दहशतवादी संघटनेकडून आणखी हल्ला होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे काश्मीरातील ५० पर्यटनेस्थळे बंद करण्यात आली आहे. जर भारताने पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई केली तर तणावपूर्ण वातावरणात पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली जाऊ शकते. सध्या संवेदनशील भागात सुरक्षा जवान तैनात आहेत. त्याशिवाय अनेक तपास यंत्रणाही अलर्टवर आहेत.
काश्मीरमध्ये तैनात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी संघटना द रेजिस्टेंस फोर्सकडून आणखी टार्गेट किलिंग केली जाऊ शकते. त्यात काश्मिरी पंडित, स्थलांतरित कामगार आणि सुरक्षा जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा एका स्थानिक दहशतवाद्याचे घर उद्ध्वस्त केले तेव्हा दहशतवादी संघटनेकडून एक व्हिडिओ जारी केला होता. जर बुलडोझर एक्शन अशीच सुरू राहिली तर हल्लेही सुरू राहतील. त्यामुळे दहशतवाद्यांकडून आणखी टार्गेट किलिंग करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे.
तर २०१९ मध्ये जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवले होते तेव्हापासून पंचायत ते विधानसभा निवडणुकीपर्यंत काश्मीरात शांतता होती. पर्यटकांचीही गर्दी वाढली. स्थानिकांना रोजगार मिळाला. वंदे भारत श्रीनगरपर्यंत पोहचली. ज्याप्रकारे पाकिस्तानात अंतर्गत कलह सुरू आहे आणि दुसरीकडे काश्मीरात वातावरण सुधारत चालले आहे. त्यामुळेच काश्मीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी टार्गेट किलिंग करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला असं जेएनयूचे आंतरराष्ट्रीय विभागाचे प्राध्यापक संदीप कुमार सिंह यांनी सांगितले.
आता पाकिस्तानची खैर नाही
दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत हल्ल्यानंतरची परिस्थिती, सुरक्षा दलांची कारवाई आणि भविष्यातील रणनीती, यावर सविस्तर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि लष्कराला कारवाई करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. "दहशतवादाला योग्य उत्तर दिले जाईल. हल्ल्याचे लक्ष्य आणि वेळ सैन्याने ठरवावी" याशिवाय, अमरनाथ यात्रा आणि इतर नागरी उपक्रमांच्या सुरक्षेत कोणतीही चूक होणार नाही, याची खात्री करण्यासही पंतप्रधानांनी सांगितले आहे.