Martyred Havaldar Jhantu Ali Sheikh: उधमपूरमधील दुडू-बसंतगड भागात २४ एप्रिल रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या विशेष दलाचा एक जवान शहीद झाला. हवालदार झंटू अली शेख, असे या शहीद जवानाचे नाव होते आणि ते स्पेशल फोर्सेसच्या ६ पॅरा ट्रुपचा भाग होते. दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान शहीद झालेले जवान झंटू अली शेख यांना पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पूर्ण लष्करी सन्मानाने दफन करण्यात आले. झंटू अली यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांना श्रद्धाजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यादरम्यान, झंटू अली शेख यांचे भाऊ रफीकुल शेख यांनी दिलेले अंगावर काटा आणणारे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शनिवारी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील त्यांच्या गावात हवालदार झंटू अली शेख यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत तीनवेळा गोळीबार करुन झंटू शेख यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी झंटू यांचे मोठे भाऊ सुभेदार रफिकुर अली शेख यांनी केलेल्या भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे. माझ्यासाठी देश आधी येतो, नंतर कुटुंब येते असे रफिकुर अली शेख म्हणाले.
"दहशतवाद्यांनी माझा भाऊ झंटू अली याच्यावर मागून हल्ला केला. आपले काम त्याच्या हौतात्म्याचा बदला घेणे आहे. आपण बदला घेऊ किंवा मरू. माझ्या भावाला दोन मुले आहेत. कृपया त्यांच्यासाठी काही व्यवस्था करा. मला अभिमान आहे की माझ्या भावाने देशासाठी आपले जीवन दिले. दुःख खूप आहे. पण लाखो लोकांपैकी काहींनाच देशासाठी मरण्याची संधी मिळते. तो केवळ आमच्या कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण नादिया जिल्ह्याचा आणि बंगालचा अभिमान आहे," असे रफिकुर अली शेख यांनी म्हटलं.
"मी माझ्या भावाच्या मुलाला आणि मुलीला सैन्यात पाठवण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी देश आधी येतो आणि नंतर कुटुंब. माझे कर्तव्य प्रथम देशाप्रती आहे. मी देशसेवेला प्रथम प्राधान्य देईन. आम्ही सैनिक आहोत, सैनिकांना कोणताही धर्म आणि जात नसते. भारतीय सैन्याला कोणताही धर्म नाही. आपण एकाच भांड्यातून खातो आणि पितो. सैन्यात कोणताही भेदभाव नाही. जर कोणात हिंमत असेल तर त्याने सांगावे की भारतीय सैन्य हिंदू आहे की मुस्लिम. भारतीय सैन्य ही अशी गोष्ट आहे जिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध एकाच ताटात जेवतात आणि सर्वांना एकाच भांड्यात जेवण वाढले जाते. जर कोणाला बंधुता पहायची असेल तर सैन्याला भेटायला जा. मग तुम्हाला कळेल की बंधुता म्हणजे काय," असेही सुभेदार रफिकुर अली शेख यांनी म्हटलं.