नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेतील महाघोटाळ्याचा म्होरक्या नीरव मोदीचं घर आणि गीतांजली शोरूमसह इतर 9 ठिकाणांवर ईडीनं आज छापे टाकले आहेत. मोदीच्या शोरूमवर टाकलेल्या छाप्यातून ईडीनं हिरे, ज्वेलरी, मौल्यवान खडे आणि सोनं असे 5 हजार 100 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या एका अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांंगितले की, मोदी आणि अन्य आरोपींच्या मुंबईतील पाच संपत्ती सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय बँक खात्यातील रक्कम आणि फिक्स डिपॉझिटची 3.9 कोटी रुपयांची रक्कमही सील केली आहे. नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी करण्यात येणार आहे. तसेच मोदी विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आला. सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 500 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचं उघड झालं. घोटाळ्यातील संशयित असलेले प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून परागंदा झाले आहेत.पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत हा घोटाळा झाल्याचे काल उघड झाले. हिरे व्यापारी नीरव मोदीने आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पंजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आज शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले. त्यामुळे पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहिलं. घोटाळ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सक्तवसुली संचलनालयाने याप्रकरणी घोटाळ्याचा सूत्रधार आणि प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी याच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु झाली आहे. नीरव मोदी याच्या मुंबईतसहीत तीन शहरांमधील शोरुम आणि कार्यालयांवर छापेमारी झाली आहे.
PNB Scam : नीरव मोदीची 5 हजार 100 कोटींची संपत्ती ईडीनं केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 21:09 IST