डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली : २००६ मध्ये लष्कर-ए-तैय्यबाचा संस्थापक हाफिज सईदची भेट घेतल्याचा आणि त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना स्वतः माहिती दिली होती, असा दावा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख व सध्या दहशतवादी गुन्ह्यांत जन्मठेप भोगत असलेला यासीन मलिक याने दिल्ली हायकोर्टातील शपथपत्रात केला आहे.
मलिक म्हणतो, ही स्वेच्छेने घेतलेली भेट नव्हती. त्यावेळचे आयबीचे विशेष संचालक व्ही. के. जोशी यांनी या भेटीचे निर्देश दिले होते. काश्मीरमध्ये २००५ मधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी पाकिस्तानला गेलो असताना, राजकीय नेत्यांबरोबरच दहशतवादी नेत्यांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले होते. हाफिज सईदच्या कार्यक्रमात मी हिंसाचार थांबवून शांततेचा मार्ग स्वीकारावा, असा संदेश दिला. जर कुणी शांततेची ऑफर देत असेल, तर ती नाकारू नका, असेही मी सांगितले होते, असे त्याचे म्हणणे आहे.
मलिक काय म्हणतो...
एनएसए एम. के. नारायण यांच्या उपस्थितीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी माझ्या संयमाचे, समर्पणाचे कौतुक केले होते व आभार मानले होते, असा मलिकचा दावा आहे.
मलिक याने मनमोहन सिंग यांच्यासोबत हात मिळवतानाचा फोटो अधिकृत भेटीचा आहे. त्या भेटीत पंतप्रधानांनी मला काश्मीरमधील अहिंसात्मक चळवळीचा प्रवर्तक म्हटले होते, असा दावा त्याने केला आहे.
वाजपेयींच्या काळातही संवाद प्रक्रियेत सहभाग
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही मला संवाद प्रक्रियेत सहभागी केले होते, असे मलिकने म्हटले. तीन दशकांपासून भारत सरकारसोबत गुप्त चर्चांमध्ये सहभाग घेतला. तत्कालीन पंतप्रधान, गृहमंत्री, गुप्तचर विभाग प्रमुख, उद्योगपती धीरुभाई अंबानी यांच्याशी संवाद साधल्याचे तो सांगतो.
१९९४ मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजेश पायलट आणि पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या आश्वासनामुळे शस्त्रे खाली ठेवून एकतर्फी युद्धविराम जाहीर केला, असे त्याचे म्हणणे आहे.
शपथपत्र कशासाठी?
२०२२ मध्ये एनआयए न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत वाढ
करून फाशी देण्यासाठीची याचिका एनआयएने दाखल केली असून,
याच्या उत्तरात हे शपथपत्र दाखल करण्यात आले आहे.