New Year 2025: नवीन वर्ष २०२५ ची सुरुवात झाली असून मंगळवारी रात्री जगभरातील लोकांनी नवीन वर्षाचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले. त्यानंतर लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट लिहून देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी, अखिलेश यादव यांसारख्या विरोधी पक्षांच्या नेत्यांसह अनेक बड्या व्यक्तींनी संपूर्ण देशाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टवरुन देशवासियांना नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "२०२५ च्या शुभेच्छा! हे वर्ष प्रत्येकासाठी नवीन संधी, यश आणि अनंत आनंद घेऊन येवो. सर्वांना आरोग्य आणि समृद्धी लाभो," असं पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. याआधी त्यांनी एका पोस्टमध्ये काव्यात्मक ओळी लिहून देशवासीयांना खास संदेशही दिला होता. तसेच २०२४ मध्ये देशात झालेले बदल यांचाही उल्लेख करण्यात आला.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना राजनाथ सिंह यांनी "तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सर्वांना सुख, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो, हीच माझी इच्छा आहे," असं म्हटलं.
तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, मला आशा आहे की हे वर्ष तुमच्या आयुष्यात नवा उत्साह, नवा आनंद आणि आनंद घेऊन येवो," असं राहुल गांधींनी म्हटलं.
काँग्रेस अध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "माझ्या प्रिय देशबांधवांनो, २०२५ मध्ये प्रवेश करत असताना, आपण सर्वसमावेशक प्रगती, विविधतेतील एकता, सामाजिक न्याय, समानता आणि आपल्या संविधानाच्या संरक्षणाबाबतच्या आपल्या कटिबद्धतेचा अटूट संकल्प करू या. सर्व आशा, आनंद आणि समृद्धीसाठी शुभेच्छा जय हिंद," असं खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.