PM Narendra Modi: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर देताना काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस हा पक्ष लोकशाही विरोधी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. बॉलीवूडच्या प्रसिद्ध व्यक्तीची नावं घेऊन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी, देव आनंद, लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि काँग्रेसने त्यांना वाईट वागणूक दिल्याचे म्हटलं. काँग्रेसने नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपले असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल करत पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण करून दिली. आणीबाणीच्या काळात सत्तेच्या आनंदासाठी राज्यघटना पायदळी तुडवली गेली. संविधान निर्मात्यांचा आदर करून त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी होती, पण स्वातंत्र्यानंतर लगेचच काँग्रेसने संविधान निर्मात्यांच्या भावना नष्ट केल्या. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात भाषण स्वातंत्र्य दाबण्याचे काम केले होते. वृत्तपत्रे आणि माध्यमांवर लगाम लावला होता. एवढंच नाही तर अनेक कवी आणि कलाकारांनाही चुकीची वागणूक मिळाली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांवरील कविता आकाशवाणीवर सादर करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना काँग्रेस सरकारने कायमचे हद्दपार केले, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
"हे देशातील पहिले सरकार होते, जेव्हा नेहरूजी पंतप्रधान होते, तेव्हा मुंबईत कामगारांचा संप झाला होता ज्यामध्ये प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी जी यांनी एक गाणे गायले होते. त्यांनी ‘कॉमनवेल्थ का दास है’ नावाची कविता गायली. त्यांच्या गायनामुळे नेहरूजींनी देशातील एका महान कवीला तुरुंगात टाकले. प्रसिद्ध अभिनेते बलराज साहनी यांनी आंदोलकांच्या एका मोर्चात भाग घेतला होता, ज्यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी आकाशवाणीवर वीर सावरकरांवर कविता सादर करण्याची योजना आखली होती. एवढ्या वरुनच त्यांना आकाशवाणीतून कायमचं हाकलून दिलं," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
संसदेच्या सदस्यांना साखळदंडांनी बांधण्यात आलं
"आणीबाणीच्या काळात प्रसिद्ध कलाकार देव आनंद यांना जाहीर पाठिंबा देण्यास सांगितले होते. पण त्यांनी नकार दिल्यावर त्यांच्या सर्व चित्रपटांना दूरदर्शनवर बंदी घालण्यात आली. जेव्हा किशोर कुमार यांनी काँग्रेससाठी गाण्यास नकार दिला तेव्हा त्यांच्या सर्व गाण्यांवर ऑल इंडिया रेडिओवर बंदी घालण्यात आली होती. आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह देशातील अनेक मान्यवरांना हातकड्या घालून साखळदंडांनी बांधण्यात आले होते. संसद सदस्य आणि देशातील मान्यवर नेत्यांना हातकड्या आणि साखळदंडांनी बांधण्यात आलं होतं," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
संविधान हा शब्द काँग्रेसच्या तोंडून शोभत नाही
"सत्तेसाठी आणि राजघराण्याच्या अहंकारापोटी देशातील लाखो कुटुंबे उद्ध्वस्त करून देशाचे तुरुंगात रूपांतर झाले. आणीबाणीच्या वेळी खूप मोठा संघर्ष झाला. शेवटी स्वतःला महान 'तीस मार खान' समजणाऱ्यांना जनमताची ताकद स्वीकारावी लागली. गुडघे टेकावे लागले आणि जनमताच्या बळावर देशातून आणीबाणी उठवली गेली," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.