भारत आणि इस्रायलमधील संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा इस्रायलच्या दोन दिवसीय (२५-२६ फेब्रुवारी) दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विशेष निमंत्रणावरून हा दौरा होत असून, जगभरातील राजनैतिक तज्ज्ञांचे लक्ष याकडे लागले आहे.
"मित्राच्या भेटीसाठी उत्सुक..."
विमानातून रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "माझे प्रिय मित्र बेंजामिन नेतान्याहू यांच्या निमंत्रणावरून मी या ऐतिहासिक दौऱ्यावर जात आहे. गेल्या काही वर्षांत भारत आणि इस्रायलमधील सहकार्य वेगाने वाढले आहे. मला खात्री आहे की, ही भेट दोन्ही देशांतील संबंधांना अधिक बळकटी देईल आणि भविष्यातील नवीन उद्दिष्टे ठरवेल."
संसदेत भाषणाचा बहुमान
पंतप्रधान मोदी या दौऱ्यात इस्रायलच्या संसदेला म्हणजेच 'नेसेट'ला संबोधित करणार आहेत. असा बहुमान मिळवणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरतील. याबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, "इस्रायलच्या संसदेत बोलण्याची संधी मिळणे हा दोन्ही देशांमधील मजबूत लोकशाही मूल्यांचा सन्मान आहे. मी केवळ राष्ट्रपती आयझॅक हर्झोग आणि पीएम नेतान्याहू यांनाच भेटणार नाही, तर तेथे राहणाऱ्या भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहे."
दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरन्स'
पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, काल (मंगळवारी) दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. यामध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी 'झिरो टॉलरन्स' धोरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. माहितीची देवाणघेवाण आणि तांत्रिक सहकार्य वाढवून जागतिक दहशतवादाला पायबंद घालण्याचा संकल्प दोन्ही देशांनी केला आहे. भारत आणि इस्रायलमधील ही 'ग्रँड दोस्ती' येणाऱ्या काळात आशियाई राजकारणात नवी समीकरणे मांडणार, हे निश्चित मानले जात आहे.
Web Summary : PM Modi's Israel visit after 9 years seeks to bolster strategic partnership. He will address the Knesset, a first for an Indian PM, and engage with the Indian community. Both nations reaffirm 'zero tolerance' against terrorism, paving way for stronger ties.
Web Summary : पीएम मोदी 9 साल बाद इस्राइल दौरे पर, रणनीतिक साझेदारी मजबूत करने का लक्ष्य। वे नेसेट को संबोधित करेंगे, जो किसी भारतीय पीएम के लिए पहली बार होगा, और भारतीय समुदाय के साथ जुड़ेंगे। दोनों देशों ने आतंकवाद के खिलाफ 'जीरो टॉलरेंस' की पुष्टि की, जिससे मजबूत संबंधों का मार्ग प्रशस्त हुआ।