ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - महाराष्ट्र सदनातील चपाती वादाप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने शुक्रवारी शिवसेना खासदारांना दिलासा दिला आहे. चपाती प्रकरणातील ११ खासदारांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील गैरसोयीविरोधात शिवसेना खासदारांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. सदनातील कॅंटीनमधील जेवणाच्या सुमार दर्जाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे यांनी कॅंटीन मॅनेजरलाच चपाती भरवण्याचा प्रयत्न केला. मात्र मॅनेजर मुस्लिम होता व त्याचा रोजा सुरु होता. विचारेंच्या या कृत्यामुळे त्या मॅनेजरचा रोजा मोडला. शिवसेना खासदारांचे हे आंदोलन शिवसेनेच्याच अंगलट आले आणि सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झो़ड उठली होती. याप्रकरणात शिवसेनेच्या अकरा खासदारांचा समावेश होता. या अकरा खासदारांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली हायकोर्टाकडे दाखल झाली होती. शुक्रवारी हायकोर्टासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. हायकोर्टाने ही जनहित याचिका फेटाळून लावल्याने शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.