दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलने देशभरात मोठी कारवाई करत पाच दहशतवाद्यांना अटक केली. हे दहशतवादी आयएसआयएससाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाच जणांपैकी दोन मुंबईचे राहणारे असून, त्यांना दिल्लीत अटक करण्यात आली. तर, एकाला रांचीतून ताब्यात घेण्यात आले आहे. या दहशतवाद्यांना अटक करून, पोलिसांनी त्यांचे मोठे मनसुबे उधळून लावले आहेत. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत या दहशतवाद्यांना निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आहे. हे दहशतवादी दिल्लीतून शस्त्रांचा बंदोबस्त करून पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले होते. या दरम्यानच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
दिल्ली पोलीस आणि केंद्रीय एजन्सींनी मिळून दिल्ली, झारखंड आणि मुंबई या तीन राज्यांमध्ये छापे टाकले. दिल्लीत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, तर उर्वरित दहशतवाद्यांना वेगवेगळ्या राज्यांमधून अटक करण्यात आली. दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
बोलण्यासाठी वापरत होते सांकेतिक भाषादिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सांगितले की, हे दहशतवादी पाकिस्तानी हँडलर्सशी बोलण्यासाठी अनस्क्रिप्टेड कॉल्स वापरत होते, ज्या दरम्यान ते अनेक प्रकारचे कोड वापरत होते. यामध्ये गज्बा लीडर, प्रोफेसर आणि सीईओ कंपनी असे कोड सामील होते. हे लोक सोशल मीडियाद्वारे आयसीसमध्ये नवीन लोकांना भरती करण्याचे काम करत होते.
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, दिल्लीतून पकडलेला आफताब हा दहावी पास आहे, तर रांचीतून अटक केलेला दानिश सुशिक्षित आहे. दानिशने रांचीमधून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, अशर दानिश, सुफियान अबुबकर खान, आफताब अन्सारी, हुजैफा यमन आणि कामरान कुरेशी अशी त्यांची नावे आहेत.
जिहादसाठी करत होते लोकांची भरतीपोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या दहशतवाद्यांचे काम जिहादसाठी लोकांना भरती करणे होते. मात्र, त्यांचं हे जाळं पसरण्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. खिलाफत मॉड्यूल हे दहशतवादी संघटना आयसिसच्या कटाचा एक भाग आहे, ज्यामध्ये नवीन तरुणांचे ब्रेनवॉश करून संघटनेत समाविष्ट केले जाते आणि त्यांना वेगवेगळ्या भागात सक्रिय केले जाते. हे लोक दहशतवादी हल्ल्यांचे कट रचणे, शस्त्रे आणि स्फोटके गोळा करणे यासारखी अनेक कामे करतात.
स्लीपर सेलसारखे काम करायचे!मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेले पाच दहशतवादी आयसीसचे स्लीपर सेल होते. या दहशतवाद्यांचे मुख्य काम शस्त्रे आणि स्फोटके गोळा करणे आणि संघटनेत नवीन दहशतवाद्यांची भरती करणे हे होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सांगितले की, त्यांची टीम आतापर्यंत संघटनेत किती लोकांना भरती करण्यात आली आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. कोणताही मोठा कट रचण्यापूर्वीच पोलिसांनी या दहशतवाद्यांना अटक केली.