Pintu Mahara: प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभमेळ्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे दावे योगी सरकारकडून करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत याबद्दलची माहिती देताना एका नाव चालवणाऱ्या कुटुंबाने कुंभमेळ्यादरम्यान ३० कोटी रुपये कमावल्याचे सांगितले. त्यानंतर ज्याने ३० कोटी रुपये कमावले आहेत, तो एक माफिया आणि हिस्ट्रीशीटर असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. त्यावरून अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पिंटू महारा असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यावेळी तब्बल ७० होड्या तयार केल्या होत्या. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते आणि दागिनेही गहाण ठेवले होते, असे सांगण्यात आले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याच्याकडे १३० होड्या होत्या, असे सांगितले.
अखिलेश यादवांची योगींवर टीका
दरम्यान, या मुद्द्यावरून आता अखिलेश यादवांनी एक बातमी शेअर केली आहे आणि योगी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, "आधी या बातमीतील सत्यतेची पडताळणी करण्यात यावी. जर खरंच एका कुटुंबाने महाकुंभमध्ये ३० कोटी रुपये कमावले असतील, तर जीएसटी किती मिळाला, हेही सांगा."
"पाताळधुंडींनी आधी याची माहिती घ्यावी आणि नंतर सावरासारव करावी. आधी ठगासोबत करार केला आणि आता त्याचे सभागृहातमध्ये डोळे बंद करून कौतुक केले. आता तरी डोळे उघडा. याच सगळ्या गोष्टींमुळे भाजपच्या सरकारमध्ये गुन्हेगाराचे मनोबल वाढत आहे", अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत सांगितले की, एका नाविक कुटुंबाजवळ १३० होड्या होत्या. त्यांनी महाकुंभमध्ये ४५ दिवसांत ३० कोटी रुपये कमावले. म्हणजे प्रत्येक होडींने ४५ दिवसांत २३ कोटी रुपये कमावले. जर प्रत्येक होडीच्या दररोजच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर ती ५० ते ५२ हजार होती", योगी आदित्यनाथ म्हणाले होते.