पाटणा : बिहारमध्ये १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर गत १० वर्षांपासून सत्तेबाहेर असलेले राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत परतले आहेत. लालूप्रसाद यांनी या विधानसभा निवडणुकीत केवळ महाआघाडीच्या विजयाचीच पटकथा रचली नाही, तर राज्याच्या राजकारणातून हद्दपार होऊ पाहणाऱ्या आपल्या पक्षातही नवा प्राण फुंकला. न्यायालयाच्या निर्णयामुळे सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढण्यास अपात्र ठरलेल्या लालूप्रसादांचा हा ‘विजय’ निश्चितपणे नोंद घेण्याजोगा ठरला आहे.दीड शतकापर्यंत बिहारवर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या लालूप्रसादांवर नितीशकुमार आणि भाजपच्या हातमिळवणीनंतर सत्तेतून बेदखल होण्याची वेळ आली होती. २०१० च्या विधानसभा निवडणुकीत जदयू-भाजपने एकत्र येत २४३ पैकी २०६ जागा जिंकल्या होत्या, तर राजदला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले होते. विरोधी पक्षपदही या पक्षाला राखता आले नव्हते. २०१३ मध्ये चारा घोटाळ्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्यानंतर लालूप्रसादांना तुरुंगात जावे लागले होते, शिवाय न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना खासदारकी सोडावी लागली होती. पुढील सहा वर्षे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढण्यासही ते अपात्र ठरले होते. यानंतर सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लालूप्रसाद जामिनावर सुटले. या निवडणुकीत पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले, पण येथेही दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. कारण लोकसभेच्या राज्याच्या ४० जागांपैकी राजदला कशाबशा चार जागा राखता आल्या. सततच्या पराभवाने राजद बिहारच्या राजकारणातून हद्दपार होते की काय, असे वाटत असतानाच लालूप्रसादांचे राजकीय चाणाक्षपण त्यांच्या कामी आले. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांशी हातमिळवणी करण्याचा त्यांचा निर्णय योग्य ठरला
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे लालूप्रसाद ठरले खरे ‘किंगमेकर’
By admin | Updated: November 9, 2015 00:38 IST