बिहारच्या पाटणामधून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. अशोक सिंह यांनी श्वासोच्छवासाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या आपल्या पत्नीला निरोगी ठेवण्यासाठी गावातील 4 किमी लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा शेकडो रोपं लावली होती, आता झाडं शुध्द ऑक्सिजन तर देत आहेतच शिवाय ये-जा करणाऱ्यांना सावलीही देत आहेत. अशोक सिंह हे झाडांची काळजी घेण्यासाठी दररोज आठ तास घालवतात. गावात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा पिंपळ, वड, जांभूळ अशी झाडं लावली आहेत.
तरुणपणी बंगालमध्ये राहिल्यामुळे अशोक सिंह यांना बंगाली बाबा असं नाव पडलं आहे. 2011 मध्ये जेव्हा त्यांची पत्नी मनोरमा देवी यांना श्वसनाचा आजार झाला तेव्हा एका साधूने त्यांना झाडं लावण्याचा सल्ला दिला. अशोक सिंह आपल्या सायकलवरून प्रवास करत हे काम करतात. केवळ पत्नीलाच नाही तर गावातील प्रत्येक व्यक्तीला शुद्ध ऑक्सिजन मिळावा, यासाठी संपूर्ण गावात रस्त्याच्या कडेला झाडं लावण्यात आली.
12 वर्षांपासून ते हे काम करत आहेत. अशोक केवळ झाडं लावत नाही तर त्यांची काळजीही घेतात. प्रत्येक पावसाळ्यात मी 30 ते 35 रोपं लावतो असं त्यांनी सांगितलं. गावातील लोकांनी या रस्त्याला बंगाली बाबा पथ असं नावही दिलं आहे. आता तर अकौना गावाची ओळख बंगाली बाबांवरूनच होते. बंगाली बाबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. ते एका तुटलेल्या घरात राहतात. शेतीतून आपला उदरनिर्वाह करतात. असं असतानाही अशोक यांनी वृक्ष लागवडीचं हे काम करणं सोडलं नाही.
झाडांमुळे पत्नीला जीवनदान मिळाल्याचं अशोक सिंह यांनी सांगितलं. माझे संपूर्ण आयुष्यही या झाडांना समर्पित आहे. जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी झाडं लावत राहीन आणि त्यांची काळजी घेत राहीन. पाटणाच्या पुनपुन भागातील अकौना गावातील लोकही अशोक सिंह यांच्या या कामावर खूप खूश आहेत. ते झाडं लावण्यासाठी मदत करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.