निर्माणाधीन असलेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. यात एका मजुराचा मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत. राजस्थानच्या कोटामधील एक्स्प्रेस वेच्या भागावर ही घटना घडली आहे. जखमींना कोटा शहरातील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
रामगंज मंडीच्या मोडक भागात साऊंडप्रूफ बोगद्याचे काम सुरु आहे. यावेळी बोगद्याचा काही भाग कोसळला. यात चार मजूर गाडले गेले. इचर मजुरांनी तातडीने मलब्याचे दगड हटवत सहकाऱ्यांना बाहेर काढले. यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. मुकुंदरा टायगर रिझर्व्ह भागातून ४.९ किमी लांबीचा हो बोगदा बांधला जात आहे. ८ लेन असल्याने हा खूप मोठा बोगदा आहे. यावरून वन्यजीव ये - जा करू शकणार आहेत.
डोंगराखालून ३.३ किमी आणि पुढे १.६ किमी भाग हा सिमेंट काँक्रीटचा असणार आहे. यामुळे त्याला साऊंड प्रूफ बनविण्यात येणार आहे. बोगद्यातील वाहनांचा आवाज बाहेर आला तर वन्यजीव वरील भागाचा वापर करणार नाहीत. यामुळे तो साऊंडप्रूफ बनविण्यात येत आहे. १२०० कोटी रुपयांचा खर्च यासाठी येणार आहे. २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाचे इंजिनिअर काम करत आहेत.