ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. ते स्थगित करण्यात आलं आहे. ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी आहे, असे सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणार्या पाकिस्तानला स्पष्ट मेसेज दिला. आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा धर्म बघून नाही, तर कर्म बघून केला, असेही ते म्हणाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परदेश दौऱ्यावर आहेत. मोरक्कोमध्ये भारतीय समुदायाशी राजनाथ सिंह यांनी संवाद साधला.
"अजून ऑपरेशन सिंदूर पार्ट २ आणि पार्ट ३ बाकी आहे. ते आता पाकिस्तानच्या वर्तनावर अवलंबून आहे. जर ते दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी झाले, तर त्यांना उत्तर मिळेल. पहलगाममध्ये आपल्या २६ लोकांना धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या", असे राजनाथ सिंह बोलताना म्हणाले.
मी लष्करप्रमुखांना विचारलं, तुम्ही तयार आहात का?
"दुसऱ्याच दिवशी मी सरलष्करप्रमुख, तीन लष्करांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांची बैठक घेतली आणि विचारलं की, सरकारने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही तयार आहात का? तुम्हाला ऐकून आनंद वाटेल की, त्यांनी सेकंदाचाही वेळ न घेता उत्तर दिले की पूर्ण ताकदीने तयार आहोत. त्यानंतर पंतप्रधान मोदींशी बोललो आणि लष्कराला पूर्ण मूभा दिली. त्यानंतर काय झालं, तु्म्ही बघितलं असेल. १०० किलोमीटर आत जाऊन आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले", अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.
...मग शस्त्रसंधी केली
"पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्याची विनंती केली आणि भारताने ती स्वीकारली. आम्हाला चांगले संबंध हवे आहेत. कारण अटल बिहार वाजपेयी म्हणायचे की, मित्र बदलले जाऊ शकतात पण, शेजारी नाही. आम्ही त्यांना (पाकिस्तान) योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधानांनीही म्हटले आहे की, एक अल्पविराम आहे. ऑपरेशन सिंदूर तूर्तास स्थगित केलेलं आहे, ते पुन्हा सुरू केले जाऊ शकते", असे विधान राजनाथ सिंह यांनी केले.