Parliament Budget Session 2025:संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं. देशात मेक इन इंडिया अपयशी ठरलं असून यामुळेच चीन भारतात घुसला आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं. यावेळी राहुल गांधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीवरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधानांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी विनंती करावी लागल्याचे राहुल गांधी म्हणाले. यावरुन केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणानंतर मोठा गोंधळ झाला. जर आपल्या देशात चांगली उत्पादन व्यवस्था असती तर परराष्ट्रमंत्र्यांना इतक्या वेळा अमेरिकेला जावे लागले नसते आणि आपल्या पंतप्रधानांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला बोलवण्यासाठी विनंती करावी लागली नसती. परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेत जाऊन प्लीज आमच्या पंतप्रधानांना बोलवा असं म्हणायला लागलं नसतं, असं विधान राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी टीका करत असताना पंतप्रधान मोदीही लोकसभेत उपस्थित होते.
"जेव्हा आपण अमेरिकेबाबत बोलतो तेव्हा आम्ही आमच्या पंतप्रधानांना शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी परराष्ट्र मंत्र्यांना तीन-चार वेळा पाठवलं नसतं . कारण जर आमच्याकडे उत्पादन प्रणाली असती तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येथे येऊन पंतप्रधानांना आमंत्रित करु शकले असते," असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर भाजप खासदारांनी लोकसभेत गदारोळ घातला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असे निराधार आरोप करू शकत नाहीत, असं म्हटलं. विरोधी पक्षाचे नेते अशी गंभीर आणि तथ्यहीन विधाने करू शकत नाहीत. हा दोन देशांमधील संबंधांशी निगडित मुद्दा आहे आणि राहुल गांधी आमच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणाबाबत पुष्टी नसलेली विधाने करत आहेत, असं किरेन रिजिजू म्हणाले.
या गदारोळानंतर राहुल गांधींनी तुमची मानसिक शांतता बिघडवल्याबद्दल मी माफी मागतो, असे उपहासात्मकपणे म्हटले आहे. हा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मला माफ करा, असं राहुल गांधी यांनी किरेन रिजूजू यांना उद्देषून म्हटलं.
दरम्यान, राहुल गांधींच्या भाषणानंतर किरेन रिजिजू यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचे पुरावे मागवले जाऊ शकतात. राहुल यांनी जे काही बोलले त्याचे पुरावे दिले नाहीत तर त्यांना संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात यावं अशीही मागणी करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.