भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करुन पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. मात्र, तरी देखील पाकिस्तानची मस्ती काही कमी झाली नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर भारतावर हल्ला करतील, असे आयएसपीआरचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी द इकॉनॉमिस्ट दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, "भविष्यात भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढला तर पाकिस्तान भारतात घुसून हल्ला करण्याची योजना आखू शकतो, असा असीम मुनीर यांचा हेतू आहे. असीम मुनीर यांचा उद्देश भारताला चर्चेसाठी बोलवायचे आहे. पुढे ते म्हणाले की, पाकिस्तान आता पूर्वेकडून भारतावर हल्ला करेल. तसेच हे देखील समजून घ्यावे लागेल की, पाकिस्तानवर देखील कुठूनही हल्ला होऊ शकतो."
मोदींचा पाकिस्तानला इशारा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला की भविष्यात भारतीय भूमीवर होणारा कोणताही दहशतवादी हल्ला आता युद्ध मानले जाईल आणि शेजारी देशाला योग्य उत्तर दिले जाईल. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जशास तसे उत्तर देण्यात आले होते.
ऑपरेशन महादेवमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ऑपरेशन महादेव अंतर्गत झालेल्या चकमकीत मारले गेले. ऑपरेशन महादेवमध्ये सुलेमान, अफगाण आणि जिब्रान नावाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे ते म्हणाले.