जगातील प्रत्येक देशातील नागरिकांना परदेश प्रवासासाठी वेगवेगळ्या व्हिसा सुविधा मिळतात. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स या सुविधांबद्दल एक अहवाल प्रसिद्ध करतो, यामध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे हे सांगितले जाते.
या अहवालात, व्हिसाशिवाय जितक्या जास्त ठिकाणी भेट देता येईल तितकाच पासपोर्ट मजबूत मानला जातो. २०२५ च्या अहवालानुसार, पाकिस्तानचा पासपोर्ट जगातील सर्वात कमकुवत पासपोर्टपैकी एक बनला आहे.
पाकिस्तानचा नंबर कितवा?
पाकिस्तानी पासपोर्ट असल्यास, व्हिसाशिवाय फक्त ३२ देशांमध्ये प्रवास करता येतो. पाकिस्तानच्या क्रमवारीत थोडी सुधारणा झाली आहे. आता ते ९६ व्या स्थानावर आले आहेत.
'पाकिस्तानची परिस्थिती काही देशांपेक्षा थोडी चांगली आहे, यामध्ये अफगाणिस्तान, सीरिया, इराक, येमेन आणि सोमालिया सारख्या देशांचा समावेश आहे, असं अहवालात म्हटले आहे.
२०२४ च्या अहवालात, येमेनसह पाकिस्तानचा पासपोर्ट चौथ्या क्रमांकाचा सर्वात कमकुवत पासपोर्ट असल्याचे सांगितले होते. २०२५ मध्ये, त्यात थोडी सुधारणा झाली आहे, पण परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.
हा निर्देशांक १९९ पासपोर्ट आणि २२७ देशांच्या प्रवास सुविधांचे विश्लेषण करतो. व्हिसा, व्हिसा ऑन अरायव्हल, ई-व्हिसा किंवा प्रवास परवानाशिवाय पासपोर्टवर किती देशांना भेट दिली जाऊ शकते हे पाहतो.
भारताचा पासपोर्ट कितव्या स्थानावर
या अहवालात भारतासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या ६ महिन्यांत भारताने ८ स्थानांनी झेप घेतली आहे. २०२४ च्या अहवालात ८५ व्या क्रमांकावर असलेला भारतीय पासपोर्ट आता ७७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
दुसरीकडे, अमेरिका आणि ब्रिटनसारखे देश हळूहळू खाली येत आहेत. अमेरिका आता १० व्या क्रमांकावर आहे आणि ब्रिटन सहाव्या क्रमांकावर आहे. काही वर्षांपूर्वी हे दोन्ही देश अव्वल स्थानावर होते. २०१४ मध्ये अमेरिका अव्वल स्थानावर होता आणि २०१५ मध्ये ब्रिटनने पहिले स्थान मिळवले.
टॉप देशांची यादी
सिंगापूर
जपान आणि दक्षिण कोरिया
डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली आणि स्पेन
ऑस्ट्रिया, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, नॉर्वे, पोर्तुगाल आणि स्वीडन
न्यूझीलंड, ग्रीस आणि स्वित्झर्लंड