पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जगभरातून घेरण्याची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. पहलगाम हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्यानेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तान गेल्या ३० वर्षांपासून दहशतवाद पोसतोय, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांत भारताने ऐकवले आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकिस्तान एक दुष्ट देश असल्याचे म्हटले आहे.दहशतवादाचा बळी आणि वाचलेल्यांना सुरक्षित जागा प्रदान करण्याचे उद्दिष्ट असलेल्या व्हिक्टिम्स ऑफ टेररिझम ऑर्गनायझेशन नेटवर्क (VOTAN) च्या लाँचप्रसंगी त्या बोलत होत्या. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीदरम्यान दहशतवादाला पाठिंबा आणि निधी दिल्याची कबुली दिली आहे, हे जगाने पाहिले असल्याचे त्या म्हणाल्या. या उघड कबुलीजबाबाने कोणालाही आश्चर्य वाटले नाही. यावरून पाकिस्तानची प्रतिमा एक वाईट देश म्हणून स्पष्ट होते.जग आता डोळेझाक करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
भारताविरुद्ध प्रचार आणि निराधार आरोप पसरवण्यासाठी पाकिस्तानने जागतिक व्यासपीठाचा गैरवापर केल्याचाही आरोप त्यांनी केला. दहशतवादी कृत्ये गुन्हेगारी आणि अन्याय्य आहेत, त्यांचा हेतू काहीही असो.सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निःसंशयपणे निषेध केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. भारत गेल्या अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा बळी आहे. अशा परिस्थितीत, भारत दहशतवादाच्या बळींना कधीही विसरणार नाही आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी म्हटले.
वोटान ची स्थापना ही एक महत्त्वाची पायरी आहे जी दहशतवादाच्या बळींसाठी एक सुरक्षित स्थान निर्माण करेल. पीडितांना ऐकण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी एक संरचित, सुरक्षित जागा तयार होईल. दहशतवादा विरोधात जागतिक प्रतिसाद बळकट करण्यासाठी वोटनसारखे उपक्रम आवश्यक आहेत असे भारताचे मत आहे.