नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानच असून, तेथे आश्रयास असलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए -तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी आर्मी यांचा या हल्ल्यात थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे.
हा हल्ला पाकिस्तानी यंत्रणांनी ठरवून रचलेला कट होता, असे स्पष्ट संकेत एनआयएच्या तपासातून मिळाले आहेत. हल्ला झाल्यापासून एनआयएची टीम पहलगाममध्ये ठाण मांडून बसली असून, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या २० स्थानिक नागरिकांची एनआयएने चौकशी सुरू केली आहे. कोट भलवाल तुरुंगात असलेल्या निसार अहमद उर्फ हाजी आणि मुश्ताक हुसेन यांचीही चौकशी केली जाणार आहे. या दोघांचाही २०२३मध्ये झालेल्या लष्करी ताफ्यांवरील हल्ल्यांमध्ये सहभाग होता.
लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि आर्मीच्या मदतीने हल्ल्याचे नियोजन केले होते. हाशमी मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई हे या हल्ल्याचे मुख्य हँडलर होते. ते दोघेही पाकिस्तानी नागरिक आहेत. हे दोघे सीमेपलीकडून नियंत्रकांशी संपर्कात होते आणि हल्ल्याची वेळ, साधने आणि योजना यासंबंधी सूचना घेत होते.
एनआयएच्या तपासात काय आढळले?
हल्ल्याच्या आठवडाभरापूर्वी म्हणजेच जवळपास १५ एप्रिल रोजीच दहशतवादी भारतात घुसले होते. त्यांना स्थानिक संशयित आरोपी नेटवर्क, हालचाली आणि रेकीसाठी मदत करत होते. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये बैसरन, आरू व्हॅली, बेटाब व्हॅली आणि एक मनोरंजन पार्क अशा चार ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था कमी असल्यामुळे बैसरनची निवड करण्यात आली.
घटनास्थळी ४०हून अधिक काडतुसे सापडले असून, ती बॅलिस्टिक आणि केमिकल विश्लेषणासाठी पाठवली गेली आहेत. तसेच ३डी मॅपिंग आणि मोबाइल टॉवर डेटाचाही अभ्यास करण्यात आला आहे. उपग्रह फोनच्या सिग्नल्समध्ये अचानक वाढ झाल्याचेही तपासातून समोर आले आहे. बैसरन परिसरात किमान ३ उपग्रह फोन कार्यरत होते, ज्यापैकी २चे सिग्नल्स ट्रेस करून त्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. आतापर्यंत २,८००पेक्षा जास्त लोकांची चौकशी झाली असून, १५०हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सीसीटीव्ही तपासणे सुरू
पहलगाम परिसरातील ट्रांझिट पॉइंट्स आणि सार्वजनिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच सुरक्षा चौक्यांवरील नोंदींचे विश्लेषणही केले जात आहे. त्यातून दहशतवाद्यांच्या हालचालींचे ठोस पुरावे मिळवण्याचा प्रयत्न आहे.
भारताने पाकिस्तानला द्यावे प्रत्युत्तर: जेडी व्हान्स
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे भारताने अशा प्रकारे प्रत्युत्तर द्यावे, जेणेकरून त्या प्रदेशात मोठा संघर्ष उद्भवणार नाही, असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी सांगितले. पाकिस्तानच्या भूमीचा कधीकधी वापर करून घातपाती कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी भारताला पाकिस्तानने सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.