जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचा तणाव शिगेला पोहोचला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करत, सिंधू पाणी करार स्थगित करण्याबरोबरच इतरही अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. युद्धाच्या चर्चाही सुरू आहेत. यामुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच, जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तानही गप्प बसणार नाही. यावेळी विमाने एका नव्हे तर दोन्ही सीमेवरून उडतील, असे एका पाकिस्तानी पत्रकाराने म्हटले आहे.
पाकिस्तानी वाहिनी समा टीव्हीच्या पॉडकास्टमध्ये जावेद फारुकी नावाच्या एका पत्रकाराने म्हटले आहे की, "पाकिस्तानची लढाऊ विमाने बांगलादेशात तैनात आहेत. जर काही घडले तर यावेळी विमाने एका सीमेवरून नव्हे तर दोन सीमेवरून उडतील. भारताने हा भागा ज्या पद्धतीने आपल्या नियंत्रणात ठेवला होता. आता तसे नाही. सिक्योरिटी आता त्यांच्या हातात नाही. नेपाळ आणि मानमारसारखे देशही भारतावर नाराज आहेत."
हा पत्रकार पुढे म्हणाला, "भारत आणि पाकिस्तान या दोन अणुशक्ती आहेत. त्यांचे सैन्य आपल्यापेक्षा मोठे अथवा अधिक शक्तिशाली आहे, असे समजू नका. अणुशक्तीचा विचार करता, त्यांचे सैन्य पाच पट अधिक असो वा दहा पट, अणुशक्ती बरोबरीची आहे. अशा स्थितीत, कुणीही मोठा अथवा लहाण नाही. सैन्याचा विचार करता, दहशतवाद्यांसोबत लढण्याचा आपला मोठा अनुभव आहे. आता लहान दहशतवाद्यांसोबत लढण्याऐवजी मोठ्या दहशतवाद्यांशी लढू."
भारत-पाकिस्तान युद्धासंदर्भात बोलताना हा पत्रकार म्हणाला, "गेल्या २५ वर्षांचा विचार करता, आपण पाकिस्तानसोबत युद्ध करणार, असे भारत कधीही उघडपणे जाहीर करणार नाही. कदाचित तो छोटीमोठी कारवाई करू शकतो. तीही तेथील माध्यमांना दाखवण्यासाठी."